बेलापूर येथून गाढवांची चोरी करणाऱ्या तिघांना पंढरपुरातून अटक

बेलापूर येथून गाढवांची चोरी करणाऱ्य तिघा आरोपींना पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 56 हजार रुपयांची आठ गाढवं ताब्यात घेण्यात आली आहेत. अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे, जमशेद पठाण (रा. बेलापुर) आणि अहिनाथ जाधव अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बेलापूर येथील रविंद्र आंबादास बोरुडे हे माती वाहतुकीचे काम करतात. या कामाकरीता त्यांच्याकडे चार गाढव आहे. त्याला पाथरे (ता. राहुरी) येथील माती वाहतूक करण्याचे काम मिळाल्यामुळे रविंद्र आपल्याकडील 4, रवी राजेंद्र रोकडे यांच्याकडील 2 आणि भाऊसाहेब विश्वनाथ नवनिधे यांची 2 अशी 8 गाढव घेऊन पाथरे येथे गेला.

माती वाहतूक केल्यानंतर रविंद्र बोरुडे यांनी आठही गाढवं पायाला दोरी बांधुन गावातील विठ्ठल मंदिरासमोर बांधली व रात्री बेलापुरला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाथरे येथे गेले असता त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढवं आढळून आली नाही. शोधाशोध केल्यानंतरही गाठवं आढळून न आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास करत असताना ही गाढवं पंढरपूर (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गाढवं व तेथील गाढवं विकत घेणारा अहिनाथ जाधव यास ताब्यात घेतले. त्यानंतर बेलापुरातून गाढवं विकणारा अविनाश ऊर्फ सोन्या बाबासाहेब बोरुडे व टेम्पो चालक जमशेद पठाण (रा बेलापुर) या दोघांना ताब्यात घेतले. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या