बेळगावसंर्भातील ‘त्या’ पर्यायाचा पुनर्विचार करा, महाराष्ट्र एकीकरण समिती करणार उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी बेळगावसंदर्भात सुचवलेल्या पर्यायाचा पुनर्विचार व्हावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषण करणार असल्याची माहिती पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेली 65 वर्षे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न धगधगत आहे. 17 वर्षांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. बेळगाव महापालिकेच्या निवडणूक निकालाने तर मरगळ आली आहे. त्यामुळे तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी 1994 साली बेळगाव मराठीभाषिक वसाहतीसंदर्भात सुचवलेल्या तोडग्याचा पुनर्विचार व्हावा, असा सूर उमटू लागला आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हे एकदिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना भेटून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही समितीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. यावेळी खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, विशाल पाटील आदी उपस्थित होते.