बेस्टमध्ये कागदी तिकीट बंद होणार, लवकरच 100 टक्के ऑनलाईन सुविधा; वर्षाला अडीच कोटी वाचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

‘बेस्ट’मध्ये प्रवास करण्यासाठी आता लवकरच पेपरलेस तिकीट उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यात सुटय़ा पैशांची कटकट संपणार असून तिकिटाचा कागद सांभाळण्याची गरजही राहणार नाही. यामुळे कागदी तिकीट 100 टक्के बंद होणार असून ‘बेस्ट’चा तिकिटाच्या कागदावर होणार वर्षाचा अडीच कोटींचा खर्चही वाचणार असल्याची माहिती ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

रेल्वेनंतर ‘बेस्ट’ ही मुंबईची दुसरी लाईफलाईन आहे. दररोज 30 ते 35 लाख प्रवाशी ‘बेस्ट’च्या गाडय़ांमधून प्रवास करतात. ‘बेस्ट’कडे उपक्रमाच्या ताफ्यात सध्या 3,328 बसेस आहेत. यात आपल्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न ‘बेस्ट’कडून केला जात आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक एसी बसेस ताफ्यात आणल्या जात आहेत. ‘चले अॅप’सारख्या सुविधांमुळे ग्राहकांना ऑनलाईन पैसे भरून तिकीट मिळत आहे. तर डिजिटल तिकीटचा वापर वाढण्याठी अनेक ऑफरही देण्यात येत आहेत. यात आता आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. प्रवाशांना मोबाईलमध्ये ऑनलाईन तिकीट दिले जाणार आहे. यामुळे कुठलेही वेगळे कार्ड वापरावे लागणार नाही. मोबाईल अॅपच्या माध्यमातून हे तिकीट मिळणार आहे.

सध्याची उपलब्ध तिकीट प्रणाली

– स्मार्ट कार्डचा रोजचा वापर – 4 लाख 25
– मोबाईलवरील रोजचे तिकीटधारक – 1 लाख 25
– आतापर्यंत स्मार्ट कार्डचा वापर 7 लाख 30 हजार

अशी असणार नवी प्रणाली

ऑनलाईन तिकीट मिळवण्यासाठी एक मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात ठराविक रकमेचे रिचार्ज करावे लागणार आहे. यासाठी बसच्या दरवाजाजवळ ‘टॅप इन टॅप आऊट’ सुविधा उपलब्ध केली जाईल. मोबाईलमध्ये ब्ल्यू टूथच्या माध्यमातून स्वयंचलितरीत्या तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. बेस्टच्या सर्वच डेपोंमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.