मराठा साम्राज्याच्या वीरांगनेचं शौर्य मोठय़ा पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा साम्राज्यातील ‘एकमेव’ महिला सरसेनापती ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे’ यांच्यावर आधारित ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आली. ‘भद्रकाली’ ही कलाकृती साकारण्यासाठी निर्माते पुनीत बालन, लेखक दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि संगीतातील जादूगार अजय-अतुल हे दिग्गज प्रथमच एकत्र येणार आहेत.

चित्रपटाची गोष्ट 18व्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्यातील एका अशा वीरांगनेची आहे जी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची एकमेव महिला सरसेनापती ठरली. अद्भुत असं शौर्य गाजवणाऱया या लढवय्या ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे’ यांचा उल्लेख ‘भद्रकाली’ असा का झाला? याचा रंजक इतिहास म्हणजे ‘भद्रकाली’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत असून उमाबाईसाहेब यांचे वंशज, श्रीमंत सेनाखासखेल सरसेनापती सत्यशीलराजे दाभाडे यांची ऐतिहासिक संदर्भांसाठी वेळोवेळी बहुमोल मदत होत आहे. 2022मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.