
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने देहरादून गाठण्याचा निर्णय घेतला आहे. कोश्यारी दोन दिवस दिल्लीत होते. उद्या शनिवारी मुंबईतील एका नियोजित कार्यक्रमासाठी ते हजर राहतील. मात्र त्यानंतर ते देहरादूनला रवाना होतील, असे सांगण्यात आले.
‘राज्यपाल हटाव’ आंदोलनाने महाराष्ट्रात जोर धरला आहे. ठिकठिकाणी जोडे मारो, गाढवावरून धिंड अशी प्रतीकात्मक आंदोलने होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा हा रोष आणि शिवप्रेमींचा संताप पाहून कोश्यारी यांनी देहरादूनला जाणेच पसंत केल्याचे बोलले जाते. तशात भाजपच्या वरिष्ठांनीही कोश्यारी यांना देहरादून गाठण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.



























































