
एखाद्याला एका रात्रीत स्टार बनवण्याची किमया सोशल मीडियामध्ये आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पॅराग्लाययडिंग मॅन म्हणून चर्चेत आलेला ‘लँड करा दे’ असे ओरडणारा युवक. विपिन कुमार साहू असे त्याचे नाव असून उत्तर प्रदेशातील बांदा येथे राहणारा. मनालीच्या एका ट्रिपने विपिनचे नशीब पालटलं. आज तो टीव्ही शोजपासून ते अगदी वेगवेगळ्या म्युजिक अल्बममध्ये झळकताना दिसतोय.
2019 साली पॅराग्लायडिंग करताना विपिनचा व्हिडीओ व्हायरल झाला. विपिनला उंचीची भीती आहे, तरी मित्रांनी त्याला पॅराग्लायडिंग करण्यास भाग पाडले होते. अखेर होय- नाही करत तो तयार झाला होता. या व्हिडिओबद्दल विपिनने सांगितले, ‘मी त्या वेळी माझे डोळे बंद करत जोरजोरात ओरडू लागलो की, जग्गा भाई लँड करा दो, मुझे लँड करा दो’. सुरुवातीला विपिनने व्हिडिओ कुठेही शेअर न करण्याचा निर्णय घेतला, मात्र मनाली ट्रिपनंतर विपिनच्या लहान भावाने हा व्हिडिओ यूटय़ूबवर अपलोड केला. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱयासारखा पसरला. त्यानंतर विपिन कितीतरी दिवस घराबाहेर पडलाच नाही.
विपिनचा टाईल्सचा व्यवसाय आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्या दुकानात ग्राहकांची रांगच लागली. त्याचा व्यवसाय महिन्याला 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पोचला. आता तर त्याने जिमदेखील सुरू केली आहे.
टीव्ही शो, वेब सीरिजची मिळाली ऑफर
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विपिनला कलर्स टीव्हीच्या एका शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय हॉटस्टारवर एका वेब सीरिजसाठी ऑफर मिळाली. लवकरच त्याचा म्युझिक अल्बम येणार आहे.
व्हिडिओच्या कॉपीराईटमधून घसघशीत कमाई
विपिन कुमार साहू याचे स्वतःचे यूटय़ूब चॅनेलही आहे. सुरुवातीला त्याला व्हिडिओच्या कॉपीराईटबद्दल माहीत नव्हते. त्यामुळे ज्या लोकांनी ‘लँड करा दे’ व्हिडिओ अपलोड केला त्या सर्वांनी पैसे कमवले. विपिनच्या म्हणण्यानुसार, ‘लँड करा दे’ व्हिडिओची कमाई सुमारे 15 ते 17 लाख रुपये होती, परंतु त्याला फक्त 6 ते 7 लाख रुपये मिळाले. त्यानंतर एका कंपनीने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्या व्हिडिओचे कॉपीराइट घेतले. आज त्याला या व्हिडिओमधून भरघोस कमाई होतेय.





























































