
सामना प्रतिनिधी । प्रयागराज
अयोध्येत राममंदिराचे निर्माण करायचे असेल तर त्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढणे गरजेचे आहे. सरकारची अशीच ढिम्म भूमिका असेल तर 2025 मध्ये अयोध्येत राममंदिर उभे राहील, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मोदी सरकारची टर उडवली आहे. अयोध्येत राममंदिर निर्माण झाल्यावर देशाचा विकास वायुवेगाने वाढेल, असेही ते म्हणाले.
भय्याजी जोशींची कोलांटउडी
राममंदिराचे निर्माण 2025 मध्ये होणार, या विधानावरून गहजब उडताच भय्याजी जोशी यांनी लगेच कोलांटउडी मारली आहे. आजघडीला मंदिराचे काम सुरू झाले तर ते 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे आपण म्हणालो अशी सारवासारव त्यांनी केली.
काँग्रेस सत्तेवर आली तरच राममंदिर! काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांचा दावा
मर्यादेचे उल्लंघन करणारे भाजपवाले पापी आहेत. मर्यादा नष्ट करणारे मर्यादापुरुषोत्तमाचे भक्त कसे असतील? असा सवाल करत काँग्रेसचे महासचिव तथा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी अयोध्येत राममंदिराचे निर्माण काँग्रेसची सत्ता आल्यावरच होईल, असा दावा केला.
डेहराडून येथे पत्रकारांशी बोलताना हरीश रावत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपने मर्यादा उल्लंघनाचे पाप केले आहे. भाजपवाले पापी आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मर्यादा नष्ट करणारे मर्यादापुरुषोत्तमाचे भक्त कसे असू शकतात? आम्ही काँग्रेसवाले मर्यादा पाळणारे लोक आहोत. घटनेचा आदर करणारे आहोत. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर आली तरच राममंदिराचे निर्माण होईल.





















































