
सामना ऑनलाईन । मुंबई
माणूस हा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. आपलं कुटुंब सुखी रहावं म्हणून त्याचे अतोनात प्रयत्न सुरु असतात. परंतू आनंद आणि सुख देण्याच्या जबाबदारीत तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुठे ना कुठे कुटुंबाकडेही त्याचे दुर्लक्ष होते. अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणारा ज्योतीप्रकाश फिल्म्स आणि हरिश्चंद्र गुप्ता निर्मित , डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
भार्गवी चिरमुले ही या चित्रपटात सुबोध भावेच्या बायकोची भूमिका निभावतेय. “काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपल्याच घरातील वाटेल. चित्रपटातील नायक हा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी नेहमी तणावात जगत असतो. आणि याच तणावात तो आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्षित होते. या गोष्टीची जाणीव त्याला त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडल्यावर होते, आणि याच गोष्टीतून तो आणि त्याचे कुटुंब कसे सावरते हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे”, असे भार्गवी चित्रपटाचे कथानका सांगताना म्हणाली. ‘या आधीही मी सुबोध सोबत काम केलं असल्यामुळे आणि आम्ही दोघेही खूप जुने मित्रमैत्रीण आहोत. आमची बॉंडिंग खूपच मस्त होती आणि या चित्रपटामुळे अजून पक्की झाली’ असेही भार्गवीने सांगितले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपले तब्येतीकडे फार दुर्लक्ष होते. आपण सर्व गोष्टी सांभाळून आरोग्यावर आणि कुटुंबावर लक्ष दिलं तर आपण खूप सुखी राहू शकतो, असा संदेश देणारा ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन नक्की पहावा, असे आव्हान भार्गवीने केले.


























































