भाऊबीजेसाठी बहिणीकडे जात असलेल्या भावाची कार जळाली, गाडीतलं 8 तोळं सोनं वितळलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी भाऊबीज असून , यासाठी पुम्याहून दापोलीला आपल्या बहिणीकडे जात असलेल्या भावाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ही गाडी जळून खाक झाली असून यामध्ये भावाचे 8 तोळ्यांचे दागिने वितळले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सुभाष (बदललेले नाव) हा त्याची बहीण संयोगिता (बदललेले नाव) हिच्या घरी भाऊबीजेसाठी जात होता. दापोली-मंडणगड रस्त्यावर दापोलीमध्ये सुभाषच्या गाडीला अपघात झाला होता.

अपघात झाला तेव्हा सुभाषच्या गाडीत एकूण 4 जण होते. या सगळ्यांचा जीव सुदैवाने वाचला आहे. मात्र गाडीने पेट घेतल्याने ती जळून कोळसा झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सुभाषच्या गाडीमध्ये 8 तोळ्यांचे दागिने होते जे या आगीत पूर्णपणे वितळले आहे. बहिणीकडे जात असताना सुभाषची कार आंब्याच्या झाडाला आदळली होती. झाडावर आदळल्यानंतर या गाडीने पेट घेतला होता. गाडीला आग लागल्याचे पाहताच सुभाष, त्याची बायको आणि त्याची दोन्ही लहान मुले क्षणाचाही विलंब न लावता गाडीबाहेर पडली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचला आहे.