मार्गदर्शक गेला! जॉर्ज यांना श्रद्धांजली वाहताना नितीश कुमारांना अश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना नितीशकुमार यांना अश्रू अनावर झाले. फर्नांडिस यांच्या निधनाबाबत त्यांनी राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. नितीशकुमार यांनी जॉर्ज यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपण आपला मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते खूप भावूक झाले होते. जॉर्ज यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे सांगताना त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. नवी दिल्लीतील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी 7 वाजता जॉर्ज यांचे निधन झाले.

नवीन पक्ष स्थापन केल्यावर जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण जनतेच्या सेवेचे काम करत असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. आजही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे प्रकृती अस्वास्थ पाहता त्यांनी मुक्ती मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र, आमच्यासाठी तो मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जनतेसाठी केलेले कार्य आम्ही नेहमी स्मरणात ठेऊन त्यांचे कार्य पुढे नेऊ असे नितीशकुमार म्हणाले.

1974 मध्ये केलेल्या रेल्वे संपानंतर जॉर्ज प्रकाशझोतात आले होते. त्यांनी आणीबाणीचा कडाडून विरोध केला होता. केंद्रीय संरक्षण मंत्री, रेल्वेमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या जॉर्ज यांची राजकीय कारकिर्द विद्रोह, बंड, वाद आणि यश यांचे अभूतपूर्व मिश्रण असल्याचे त्यांनी सांगितले. आणीबाणीत त्यांनी शिखांचा वेश परिधान करून खुशवंतसिंग असे नाव धारण केले होते. अटक झाल्यानंतर ते तिहार कारागृहात कैद्यांना गीतेतील श्र्लोक ऐकवत असत. हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड या भाषांचे त्यांना चांगले ज्ञान होते. 1977 मध्ये कारागृहात असतानाही मझफ्फरपूर मतदारसंघातून ते मताधिक्याने निवडून आले होते. रेल्वेमंत्री असताना त्यांच्या काळातच कोकण रेल्वे सुरू झाली. ते संरक्षणमंत्री असताना देशाने अणुचाचणी केली होती. मात्र, शवपेटी घोटाळा आणि मिग 29 विमान खरेदीत गैरव्यवहाराचे आरोपही त्यांच्यावर झाले होते. मात्र, त्यातून ते निर्दोष मुक्त झाले होते.