
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयुची ‘एनडीए’ 125 जागा मिळवून काठावर पास झाली, तरी बिहारचे नेतृत्व कोण करणार? 43 जागा मिळालेले नितीशकुमार हे मुख्यमंत्री होणार का? याचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तसेच, सर्वांत मोठा पक्ष ठरलेले राजदचे तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तेजस्वी यांच्या महागठबंधनने सरकार बनविण्यासाठी तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बिहारमध्ये ऐन दिवाळीत सत्ता स्थापनेचे ‘नाटय़’ रंगणार आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास करू, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे बिहारमधील भाजप नेते सांगत असले, तरी स्वतःहा नितीशकुमारच इच्छुक नाहीत, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
जदयुला 43 जागा मिळाल्या तर भाजपकडे 74चे संख्याबळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले तरी, भाजपचा सरकारमध्ये वर्चस्व असेल. त्यामुळे सरकार चालवताना किती स्वातंत्र्य मिळेल? याबाबत नितीशकुमार यांना शंका आहे. त्यामुळे नितीशकुमार मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक नसल्याचे समजते. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून नितीशकुमारांची समजूत काढली जात असून, सरकारमध्ये भाजपचा हस्तक्षेप नसेल, असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.
चिराग यांच्या ‘लोजपा’चे काय करायचे ते भाजप ठरवेल
चिराग पासवान यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे जदयुला फटका बसला. यासंदर्भात पत्रकारांनी आज विचारले असता नितीशकुमार म्हणाले, ‘लोजपा’ला एनडीमध्ये ठेवायचे का नाही? काय करायचे? हे भाजपने ठरवायचे आहे. निकालानंतर पहिल्यांदा पत्रकारांशी नितीशकुमार यांनी संवाद साधला. शपथविधी कधी होणार? तारीख ठरली का? या प्रश्नावर नितीशकुमार म्हणाले, ‘एनडीए’तील चार पक्ष एकत्र येऊन तारीख ठरवतील. विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला संपत आहे. जर तत्पूर्वी शपथविधी होणार असेल, तर सध्याची विधानसभा बरखास्त करावी लागेल आणि मग शपथविधी होईल.


























































