जमीन नावावर न केल्याने भडकला, बायकोसह लहान मुलीची केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसा, संपत्तीपुढे माणसं वेडीपिशी होतात, रक्ताची नाती यामुळे तुटतात आणि संपत्तीसाठी जवळच्या व्यक्तींना दूर सारण्यासाठी मनुष्य कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. याची अनेक उदाहरणे आतापर्यंत आपण पाहिली आहेत. बिहारमधल्या एका घटनेची या उदाहरणांमध्ये भर पडली आहे. इथे जमिनीच्या वादातून एका माथेफिरुने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलीचीही या बापाने खांडोळी केली आहे.

राजू असे आरोपीचे नाव असून त्याची बायको रितादेवी हिच्या नावावर जमीन होते. ही जमीन आपल्या नावावर करावी यासाठी राजूने रिताच्या मागे तगादा लावला होता. ही जमीन आपली होईल अशी स्वप्ने पाहणाऱ्या राजूला रिताने जबरदस्त धक्का दिला होता. तिने ही जमीन दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर करून टाकली होती. हे जेव्हा राजूला कळालं तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या भरात त्याने कुऱ्हाड उचलली आणि रितावर वार केले. राजू रितावर जीवघेणा हल्ला करत असताना त्यांची मुलगी निक्की आणि तिची बहीण या घरीच होत्या. आईचा आरडाओरडा ऐकून दोघी धावत बाहेर आली. दोघींनी बापासमोर आडवं जात आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. राजू संतापाने इतका बेभान झाला होता की त्याला समोर आपल्या मुली आहे याचंही भान उरलं नाही. त्याने बायकोसोबत मुलींवरही वार करायला सुरुवात केली.

राजूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच त्याची बायको आणि लहान मुलगी जागीच ठार झाली आहे. मोठी मुलगी ही जखमी अवस्थेत असून तिची प्रकृती गंभीर आहे. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की हत्या केल्यानंतर राजू कितीतरी वेळ तसाच उभा होता. त्याने आपल्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही.

प्रकरण काय आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला जमीन न विचारता विकल्यामुळे राजू आणि रिता यांच्यात वाद झाला. लग्नानंतर काही वर्षांत राजू आणि रिताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यामुळे रिताने जमीन नवऱ्याच्या नावे न करता ती दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर केली होती.