आधी सोनम, आता गुंजा; बिहारमध्ये हत्येचा ‘राजा रघुवंशी’ पॅटर्न, आत्याच्या नवऱ्याशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं

मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी हत्याकांडाने देश हादरून गेला होता. लग्नानंतर मधुचंद्राला गेलेल्या राजाला पत्नी सोनमने सुपारी देऊन संपवले होते. आता असाच एक प्रकार बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात घडला असून लग्नाला दीड महिना होत नाही तोच पत्नीने सुपारी देऊन पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आत्याच्या नवऱ्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तरुणीने थंड डोक्याने कट रचला आणि प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला.

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये पतीची हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव गुंजा सिंह (वय – 20) असे आहे. तिचे आत्याचा नवरा जीवन सिंह (वय – 52) याच्याशी प्रेमसंबंध होते. याची कुणकूण घरच्यांना लागल्याने त्यांनी नबीनगर तालुक्यातील बारवान येथील 25 वर्षीय प्रियांशू कुमार सिंह याच्यासोबत तिचे लग्न नक्की केले. याच वर्षी मे महिन्यात दोघांचे थाटामाटात लग्न झाले. घरच्यांच्या दबावामुळे गुंजाला प्रियांशूसोबत लग्न करावे लागले. याचा राग तिच्या मनात कायम होता.

लग्न झाल्यानंतरही आत्याच्या नवऱ्यासोबत तिचे गुटरगू सुरू होते. दोघांमधील संबंध जगजाहीर होऊ नये म्हणून ती कसोशीने प्रयत्न करत होती. पण पतीला कधी ना कधी हे कळणार याची चाहूल लागताच तिने त्यालाच संपवण्याचे ठरवले. सोनम रघुवंशीप्रमाणेच तिने पतीचा काटा काढण्यासाठी जीवनच्या मदतीने झारखंडमधून दोन शूटर्सला बोलावले. त्यांच्यासाठी सीमकार्डची व्यवस्था केली. एवढेच नाही तर त्यांच्या प्रवासाची आणि राहण्याचीही सोय केली.

संधी मिळाली अन्…

प्रियांशूला संपवण्यासाठी गुंजा प्रियकर जीवनसोबत संधीची वाट पाहत होती. काही दिवसांपूर्वी प्रियांशू वाराणसीला त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. बहिणीची भेट घेतल्यानंतर तो घरी निघाला आणि नवी नगर स्टेशनला उतरल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे गुंजाला फोन करून कुणाला तरी दुचाकी घेऊन यायला सांगितले. त्यानंतर गुंजाने पतीचा ठावठिकाणी सुपारी दिलेल्या लोकांना दिली. हल्लेखोरांनी प्रियांशूला गाठून त्याला गोळ्या घातल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

गुंजाने दिला कबुलीजबाब

दरम्यान, हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये सुपारी देऊन ही हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास केल्यावर ही सुपारी प्रियांशूच्या पत्नीनेच दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिला ताब्या घेत पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा ती पोपटासारखी बोलू लागली आणि आत्याच्या नवऱ्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.