आजपासून वीज कर्मचारी घड्याळ्याच्या काट्यावर धावणार, बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षापासून रमतगमत कार्यालयात येणारे महावितरणचे वीज कर्मचारी उद्या बुधवार, 1 डिसेंबरपासून घड्याळाच्या काट्यावर धावणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला सकाळी 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत थम्ब पंच करावे लागणार आहे.

महावितरणने कोरोनाची संसर्ग वाढू नये म्हणून मार्च 2020 मध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. त्यामुळे थम्ब पंचमधून कर्मचाऱ्यांची सुटका झाली होती. मात्र बायोमेट्रिक हजेरी असताना अगदी वेळेवर येणारे कर्मचारी-अधिकारी अर्धा-पाऊण तास उशिरा येऊन हजेरी वहीत सही करायचे, मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महावितरणने आपल्या राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे.