
भारतीय जनता पक्षाने सत्ताप्राप्तीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते त्याच भाजपाला आता बंडखोरीच्या भीतीने स्वतःच्याच कार्यकर्त्यांचे फोन टॅप करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन व व्हॉट्सअॅपवर कमळाबाईची बारीक नजर आहे. इतकेच नव्हे तर तसा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागला तरी संबंधित कार्यकर्त्यासाठी पक्षाची दारे कायमची बंद करण्याची धमकीही भाजपने दिली आहे.
भंडारा येथे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना या फोन टॅपिंगची जाहीर कल्पना दिली. सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याच्या रागात कार्यकर्ता तमाशा करतो; पण त्याने बंडखोरी केली तर त्याचीच दारे बंद होतील, असा दम बावनकुळे यांनी भरला. चुकीचे बटण दाबू नका. तुमची चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ करेल, असे बावनकुळे पुढे म्हणाले.
भाजप मित्रपक्षांवर पाळत ठेवतेय- काँग्रेस
भाजपा सत्तेतील मित्रपक्षांवर पाळत ठेवत आहे, मोबाईल सर्विलन्सवर ठेवणे ही भाजपा सरकारची जुनीच प्रवृत्ती असून देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आयपीएस रश्मी शुक्लांनीही राज्यातील 50 नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचे उद्योग केले होते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आता भाजपावाले विरोधकांच्या बाथरुम, संडासमध्येही कॅमेरे लावायला मागेपुढे पाहणार नाहीत, कारण ते संस्कृती व सभ्यतेच्या पुढे गेले आहेत, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे, असे सपकाळ म्हणाले.
निगेटिव्ह प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लक्ष आहेच – बावनकुळे
भंडाऱ्यातील विधानाबद्दल प्रसारमाध्यमांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची आज प्रतिक्रिया घेतली. निगेटिव्ह प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षाचे लक्ष आहेच, असे त्यांनी सांगितले. भाजपचे महाराष्ट्रात 1 लाख बूथ आहेत आणि ते वॉर रूमशी कनेक्ट आहेत. भाजपचे 1 लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत, त्यात कोणता कार्यकर्ता सरकारची कोणती योजना कशा पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवतो याची माहिती मिळते. त्या ग्रुपवर कोण काय व्यक्त होतो आणि समाजातून त्यावर काय प्रतिक्रिया आहेत याची रोजच्या रोज आम्ही माहिती घेतो, असे बावनकुळे म्हणाले.
बंडखोरी कराल तर कायमची अद्दल घडेल
कोण काय बोलतोय, काय पोस्ट करतोय, सोशल मीडियात काय व्हायरल करतोय हे सर्वकाही पक्षाला समजत राहणार आहे. बंडखोरी करण्याचे मनातही आणू नका नाहीतर कायमची अद्दल घडेल, असा सज्जड दमच बावनकुळे यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिला.































































