
सामना ऑनलाईन, मुंबई
कोयना धरणग्रस्तांना दिलेली १७६७ कोटी रुपयांची नवी मुंबईतील २४ एकर जागा भाजप सरकारने अवघ्या तीन कोटींत बिल्डर मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप आज काँग्रेसने केल्याने महाराष्ट्रात जणू राजकीय भूकंपच झाला आहे. आतापर्यंत भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण काँग्रेसने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच थेट आरोप केले असून भाजप आमदार प्रसाद लाड यांचे भतिजा व भालेराव या बिल्डरांसोबतचे फोटोही फडकवून खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभाग, त्यांच्याच अखत्यारीतील सिडको आणि बिल्डरांनी केलेल्या या घोटाळय़ाला मुख्यमंत्र्यांचाच आशीर्वाद असल्याचे काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
प्रसाद लाड यांचा पुढाकार
कोयना प्रकल्पामुळे हजारो शेतकरी विस्थापित झाले. मात्र याच ८ शेतकरी कुटुंबांना नवी मुंबई सारख्या चांगल्या ठिकाणी जागा कशी काय दिली जाते? असा सवाल काँग्रेसने केला. पॅराडाइज बिल्डरने याआधीच या जागेसाठी करार केला होता, असे सांगत हा व्यवहार भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले प्रसाद लाड यांच्या संगनमताने झालेला आहे. या जमिनीची मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विक्री करण्यात आली असून, यामधील मनीष भतिजा हा भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
भाजपने आरोप फेटाळले
काँग्रेसने केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपानेही तातडीने पत्रकार परिषद घेतली. प्रदेश प्रवत्ते माधव भांडारी व आमदार प्रसाद लाड यांनी या आरोपाचे खंडन केले. निरूपम हे भरकटलेले नेते असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि ज्येष्ठ नेत्याने निरूपम यांचे ऐकून असे आरोप करावे हे आश्चर्यकारक आह, असा टोला लाड यांनी लगावला.
या जमिनीची रेडीरेकनरनुसार किंमत ५.२९ कोटी रूपये होते. त्या जमिनीची १७०० कोटी किंमत कशी झाली हे काँग्रेसने सांगण्यासारखा दुसरा विनोद नसल्याचे सांगून माधव भांडारी म्हणाले, अशा प्रकारे शेकडो नव्हे तर हजारो जमिनी काँग्रेसच्या आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिल्या गेल्या आहेत. काँग्रेसची जर या ८ प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी असेल तर आधीच्या देखील प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भंडारी यांनी केली.
काय आहे हा घोटाळा?
- खारघरमधील जमीन सिडकोच्या अखत्यारीत येत असतानाही रायगड तहसीलदारांनी ही जमीन हस्तांतरण करण्यास २६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली.
- १४ मे २०१८ रोजी तहसीलदार कार्यालयाने २४ एकर जमिनीचा सर्वे केला असून ती हस्तांतरित करता येईल असे कळवले.
- त्याच दिवशी विक्रीखत झाले, लगेच ८ शेतकरी कुटुंबांची पॉवर ऑफ ऍटर्नी मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना मिळाली.
- ज्या कामांना अनेक महिने लागतात ती प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करण्यात आल्याकडे लक्ष वेधताना वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलवल्यामुळेच हे झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
- १४ मे २०१८ रोजीच तलाठय़ाने ही जमीन पॅराडाईज बिल्डरच्या नावे केली.
५०० कोटींचा दावा ठोकणार
नवी मुंबईतल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने केलेले आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी फेटाळून लावले. हे आरोप बिनबुडाचे असून प्रदेश काँग्रेस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला आणि संजय निरूपम यांच्याविरोधात ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा लाड यांनी दिला आहे. मनीष भतिजा आणि संजय भालेराव हे आपले मित्र आहेत, पण माझी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची व्यावसायिक भागिदारी नसल्याचे सांगून प्रसाद लाड म्हणाले, न्यायालयातच काँग्रेसने आपल्याविरोधातील पुरावे सादर करावेत.
- नियमाप्रमाणे हे शेतकरी १० वर्षे त्यांची जमीन विकू शकत नाहीत, मग हा व्यवहार कसा काय झाला? पॅराडाईज बिल्डरला सरकारचे हजारो कोटींचे नुकसान करून कवडीमोल भावाने जमीन का देण्यात आली?– पृथ्वीराज चव्हाण
- या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. प्रसाद लाड, बिल्डर भतिजा आणि भालेराव यांच्या हितसंबंधांची सखोल चौकशी झाली पाहिजे– रणदीप सुरजेवाला
कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱयांपैकी ८ शेतकऱयांना नवी मुंबई विमानतळाजवळ रांजणपाडा, खारघर येथे २४ एकर जमीन देण्यात आली होती. नवी मुंबई विमानतळाजवळ मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असून आजच्या बाजाराभावाप्रमाणे या जमिनीची किंमत सुमारे १७६७ कोटी होते. ही जमीन या ८ शेतकरी कुटुंबांकडून पॅराडाईज बिल्डरच्या मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांनी १५ लाख रुपये प्रति एकर अशा कवडीमोल भावाने दमदाटी करून विकत घेतली. सुमारे १७६७ कोटींची जमीन या बिल्डरने फक्त ३ करोड ६० लाख रुपयांना जबरदस्तीने घेतल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
बुधवार, ४ जुलैपासून नागपूर येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस आधी फडणवीस सरकारच्या जमीन घोटाळ्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसने खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही – पृथ्वीराज चव्हाण
हे सगळे प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कोयना प्रकल्पामुळे हजारो शेतकरी विस्थापित झाले असून अनेकांचे पुनर्वसन होणे बाकी असताना फक्त याच ८ शेतकरी कुटुंबांनाच नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी जमीन कशी देण्यात आली? विस्थापितांना शेतजमीन देण्याचा सरकारचा नियम आहे. परंतु यांना शहरातील जमीन कशी काय दिली? पॅराडाईज बिल्डर आणि सिडको व नागरी विकास मंत्रालय यांच्यामध्ये कोणते संबंध आहेत? सिडकोच्या अखत्यारीत असलेली जमीन तहसीलदार कार्यालयातून, नागरी विकास मंत्रालय आणि महसूल विभागाकडून मंजुरी का देण्यात येते? असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले. मी मुख्यमंत्री होतो. एवढे मोठे व्यवहार व जमीन हस्तांतरण मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती असणारच, असा दावाही चव्हाण यांनी केला.
सगळय़ांचीच मिलीभगत – सुरजेवाला
सगळे कायदे धाब्यावर बसवत नावांमध्ये बदल करणे, पॉवर ऑफ ऍटर्नी देणे, सर्वे… या सगळ्या गोष्टी एका दिवसांत म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये उरकण्यात आल्या. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही. उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवत्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.




























































