महाजनांचा जळगावकरांच्या संकटाकडे कानाडोळा, समांतर रस्त्याप्रश्नी साधली चुप्पी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

मुख्यमंत्र्यांचे खासमखास अशी ओळख असलेले जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी समांतर रस्त्याच्या प्रश्नावर सोयीस्करित्या मौन बाळगत चुप्पी साधली आहे. महाजन यांना समांतर रस्त्याचा तिढा सुटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. 100 दिवसात 200 कोटी आणुन जळगावचा कायापालट करू असे आमिष दाखवुन जळगाव मनपाची सत्ता त्यांनी भाजपकडे खेचुन आणली. जळगाव शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 अर्थात एशियन हायवे क्र. 46 च्या समांतर रस्त्याची मागणी गेली अनेक वर्ष जळगावकर करीत आहेत. मात्र चार वर्षात भाजपाला हा प्रश्न केंद्र व राज्यात सत्ता असुनही सोडवता आला नाही. या महामार्गाला जोडुन समांतर रस्ते नसल्यामुळे किरकोळ अपघात, गंभीर दुखापत आणि प्राणाला मुकणाऱ्या नागरिकांची वर्षभरातील आकडेवारी मोठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास अशी स्वतःची प्रतिमा उभी केलेले जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी जळगावकरांच्या समांतर रस्त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आजवर वजन खर्ची घातले नाही, असे जाणकार सांगतात.

जळगाव शहर व जिल्हावासीयांच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असलेल्या समांतर रस्ते निर्मितीसाठी गेली चार वर्ष गिरीष महाजन हे कमालीचे पिछाडीवर पडले आहेत. जळगावात गेली सहा दिवस सरकारदरबारी अधीकृत नोंद नसलेल्या बिगर राजकीय समांतर रस्ते कृती समितीकडुन साखळी उपोषण सुरू आहे. तसेच यापुर्वी रास्ता रोकोही करण्यात आला. मात्र या प्रश्नात महाजन यांनी कधीच त्यांची भुमिका माध्यमांसमोर स्वतःहुन मांडली नाही. नाशिक, जळगाव मनपा, पालघर लोकसभा आणि आता धुळे मनपा निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी दिवस खर्ची घालणाऱ्या महाजन यांनी काही तासासाठी का होईना समांतर रस्त्याचा विषय सोडविण्याकरीता शासन दरबारी प्रयत्न करावा अशी अपेक्षा जळगावकर नागरिक बाळगुन आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे या विषयातील सोईस्कर दुर्लक्ष आणि बाळगलेले मौन या विरुद्ध जनतेतुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.