
पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी सायन कोळीवाडा मतदारसंघाचे भाजप आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांना सोमवारी विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. सेल्वन यांच्यासह इतर चार जणांना न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 13 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला.
सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सोमवारी सायंकाळी हा निकाल जाहीर केला. आरोपींमध्ये कॅप्टन सेल्वन यांच्यासह माजी नगरसेवक जसबिरसिंग बिरा, इंद्रपालसिंग मारवा, दर्शनबीर सिंग कोच्छर, गजानन पाटील यांचा समावेश आहे. सायन कोळीवाडा परिसरात निर्वासितांसाठी बांधलेल्या इमारतींची अत्यंत जीर्ण स्थिती झाल्यामुळे 2017मध्ये पालिका कर्मचाऱ्यांचे पथक संबंधित पंजाबी कॉलनीच्या तपासणीसाठी दाखल झाले होते. याच वेळी पालिकेच्या पथकाने काही बेकायदेशीर विद्युत व पाणीपुरवठा जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी भाजप आमदार कॅप्टन सेल्वन व इतरांनी पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कॅप्टन सेल्वन व इतर चार जणांविरुद्ध विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे खटला चालला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुमेश पांजवानी यांनी सादर केलेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले. तसेच त्यांना विविध कलमांतर्गत तीन ते सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि प्रत्येकी 13 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला.
शिक्षेला महिनाभराची स्थगिती
न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर दोषींनी अपील दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला महिनाभराची स्थगिती दिली. या वेळी दंडाची रक्कम भरून घेत दोषींना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दंडाची रक्कम जखमी साक्षीदारांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
































































