मातीतले खेळ…आंधळी कोशिंबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर,[email protected]

आंधळी कोशिंबीर या खेळाचे नाव थोडेसे विचित्र असले तरी मनाला निखळ आनंद मिळवून देणारा हा खेळ सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

आंधळी कोशिंबीर हा लहानपणी जवळजवळ प्रत्येकाने खेळलेला खेळ. आंधळी कोशिंबीर हे नाव जरी आठवले तरी आपण लहानपणी केलेल्या गमतीजमती नक्कीच डोळ्यांसमोरून तरंगून जातील. हा खेळ खेळताना आपण केलेली धम्माल व थरार मात्र आजही टिकून आहे. प्रत्येक शाळेत, आपण राहतो त्या गल्लीबोळात, गावागावात, शहरात हा खेळ अजूनही खेळला जातो व त्यामुळेच या खेळातील थ्रील अजूनही टिकून आहे. या खेळात एका खेळाडूच्या डोळ्यांवर रुमाल किंवा कापडी पट्टी बांधली जाते व तो इतर खेळाडूंच्या आवाजावरून किंवा होणाऱया भासावरून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. यात होणारी धावपळ, करावा लागणारा अंदाज, अंधारात लक्ष भेदण्याचा प्रयत्न यामुळे आपली विविध इंद्रिये जागृत होत असतात किंवा करावी लागतात व आपला चपळपणासुद्धा सिद्ध करताना होणारी आपली उत्सुकता व तगमगसुद्धा पणाला लागत असते.

 या खेळाचे नाव थोडेसे विचित्र असले तरी मनाला निखळ आनंद मिळवून देणारा हा खेळ सर्वांनाच हवाहवासा वाटतो. काहींच्या मते कौशाम्बी नगरीतील ‘अंधाकौशिंबी’ या प्राचीन खेळावरून हे नाव आले असावे. हा खेळ घरात, बाहेर मैदानात, मर्यादित चौरस जागेत किंवा बागेत असा कोठेही खेळता येतो. यात खेळाडूंच्या संख्येवर कोणतेच नियंत्रण नसते. कितीही खेळाडूंना हा खेळ एकावेळी खेळता येतो. खेळ सुरू होण्याआधी सुटावे लागते. त्यात ज्याच्यावर राज्य येते त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते, जेणेकरून त्याला काहीच दिसत नाही. डोळे बांधलेल्या खेळाडूची दिशाभूल करण्यासाठी प्रथम त्यास गरागरा फिरवितात व इतर आजूबाजूला पळतात. त्यानंतर हा खेळ सुरू होतो. राज्य असलेल्या खेळाडूने हात पुढे करून चाचपडत इतर खेळाडूंना पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो. या खेळाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे राज्य असलेल्या खेळाडूचा थोडा स्पर्श झाला तरी खेळाडू बाद होतो आणि त्याच्यावर राज्य येते आणि पुढे हा खेळ असाच चालू राहतो.

राज्य घेणाऱयाला काही दिसत नसल्यामुळे हा खेळ खेळताना जास्त पळापळ होत नाही. त्याला चकवण्यासाठी इतर खेळाडू टाळ्या वाजवतात, वेगवेगळे आवाज काढतात तर कधी हाकाही मारतात. सगळ्यांचा एकत्र आवाज आल्यामुळे तो खेळाडू गोंधळतो. एखादा हुशार असलेला खेळाडू त्याच आधारे दुसऱया खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये इतरांपैकी कोणासही शिवणे, चाचपून ओळखणे किंवा आवाजावरून ओळखणे असे या खेळाचे काही प्रकारभेदसुद्धा आहेत. यांपैकी कोणत्याही प्रकाराने शिवलेला वा ओळखलेला खेळाडू बाद होतो व त्याच्यावर राज्य येते व खेळ पुन्हा चालतो.

या खेळात आपली विविध इंद्रिये पणाला लागतात. अंधारात लक्ष भेदण्याची कला यातूनच फुलत गेली असावी. महाभारतातील कर्ण किंवा अर्जुन अंधारात लक्ष भेदत असल्याचे अनेक दाखले आपल्या वाचनात आले असतीलच. फक्त आवाजावरून लक्ष भेदून ही कलासुद्धा याच प्रकारातून विकसित झाली असावी. आवाजावरून लक्ष भेदण्याच्या कलेवरून एकलव्याने महाभारतात कुत्र्याच्या तोंडात एकाच वेळी अनेक बाण सोडून व कोणतीही इजा न करता आवाज बंद केल्याचा दाखला दिला जातो. महाभारतातच रात्रीच्या युद्धात अर्जुन नेहमीच वरचढ ठरला त्याचेही कारण अंधारात त्याने केलेला बाण सोडण्याचा सराव त्याला नेहमीच यश मिळवून देत होता. अंधारात कोणीही समोर दिसत नसताना फक्त आवाजावरून लक्ष साधावे लागते व हा गुणही याच आंधळी कोशिंबीर या खेळातून विकसित होतो. याचाच अर्थ या खेळात खेळाडूला एकाग्रता अतिशय उच्च कोटीपर्यंत वाढवावी लागते. त्याचबरोबर चपळतेत जराही केलेली कुचराई किंवा जोखीम महागात पडते व हातातोंडाशी आलेला खेळाडू / प्रतिस्पर्धी सहज हुलकावणी देऊन निसटून जातो.

‘लंगडी आंधळी कोशिंबीर’ हासुद्धा या खेळाचाच एक उपप्रकार आहे. यात राज्य असलेला खेळाडू सोडून इतर सगळे लंगडी घालत पळतात व राज्य असलेला खेळाडू त्यांना बाद करण्याच प्रयत्न करतो. हा खेळ भारतातच नाही तर चीन, जपान, कोरियासारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो.