
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. ११च्या वतीने रविवार दि. २२ जुलै २०१८ रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन लालबागमध्ये करण्यात आले आहे.
शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबुरकर आणि महीला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांनी आयोजित केलेले हे महारक्तदान शिबीर लालबाग साईबाबा पथ येथील महानगरपालिका शाळेत सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या शिबीरात सुमारे ३ हजार रक्तदाते सहभागी होणार असून प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहन बक्षिस म्हणून मिनी होम थिएटर स्पिकर्स भेट देण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरात २ हजार ५६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. या वर्षीही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, अशी आशा आशिष चेंबुरकर यांनी व्यक्त केली आहे.
































































