मुंबई महापालिकेच्या CBSE शाळा प्रवेशाची सोडत जाहीर;1282 विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यंदापासून सुरू करण्यात आलेल्या सीबीएसई शाळांच्या प्रवेशाची सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. आजच्या सोडतीत 1 हजार 282 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.  सोडतीत नवीन 10 शाळांमध्ये असलेल्या तीन हजार 760 जागांसाठी तब्बल नऊ हजार 523 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले होते.

मुंबई महापालिकेच्या सीबीएसईच्या 10 शाळांमध्ये यंदा ज्युनियर केजी, सीनियर केजी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी या वर्गातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. गेल्या वर्षी केंद्रीय बोर्डाच्या दोन शाळा सुरू केल्या होत्या. यंदा 10 शाळा वाढवल्या आहेत. या शाळा मुंबई पब्लिक स्कूल नावाने सुरू करण्यात आल्या आहेत. नर्सरीसाठी 203 तर छोटी शिशूसाठी सर्वाधिक 204 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर सहावीसाठी 97 आणि सातवीसाठी तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. सर्वाधिक प्रत्येकी 306 प्रवेश हे सीबीएसईच्या मुंबई पब्लिक स्कूल – प्रतीक्षानगर (जोगेश्वरी पश्चिम) आणि मुंबई पब्लिक स्कूल हरियाली (विक्रोळी) या दोन शाळांसाठी झाले आहेत. उर्वरित जागांच्या प्रवेशासाठी पुन्हा लॉटरी काढण्यात येणार आहे, असे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्याचे मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आजची सोडत जाहीर करतेवेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे उपस्थित होते.