तलावातील पाण्यापेक्षा जास्त पाणी मुंबईच्या रस्त्यांवरून उपसले, म्हणून मुंबई वाचली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पावसाने या वर्षी मुंबईत ओव्हरटाइम करून एकदाही मुंबई ठप्प झाली नाही. महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्यांच्या केलेल्या विविध कामांमुळे पाण्याचा निचरा वेगाने होत होताच. पालिकेने उभारलेल्या पाच पंपिंग स्टेशनने रस्त्यावरील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केल्यामुळे अक्षरशः मुंबई वाचली आहे. विहार आणि तुळशी तलावात सध्या जेवढा पाणीसाठा आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी यंदाच्या पावसाळ्यात या पंपिंग स्टेशनने उपसले आहे.

चहूबाजूंनी समुद्र आणि बशीसारखा आकार असलेली मुंबई त्यातच वरून धोधो कोसळणारा पाऊस, यामुळे मुंबईला पाणी तुंबण्याचा धोका दरवर्षी असतो. भरती आणि पाऊस असा योग जुळून आला तर पाण्याचा निचराही होत नाही. अशा बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत हाजीअली, ब्रिटानिया, क्लिव्हलॅण्ड, इर्ला, लव्हग्रोव्ह या ठिकाणी पाच ठिकाणी पंपिंग स्टेशन्स उभारली आहेत. या पंपिग स्टेशनमधील भल्या मोठय़ा पंपांमुळे पर्जन्य जलवाहिन्यांमधील पाण्याचा उपसा वेगाने होत असतो. या पंपिंग स्टेशनची कामे झाल्यामुळे अर्ध्याअधिक मुंबईची पाणी साचण्याच्या समस्येतून सुटका झालेली आहे.

पाच पंपिंग स्टेशन्सवर मिळून ३७ पंप असून या पावसाळय़ात आवश्यकतेनुसार हे पंप पाण्याचा उपसा करण्यासाठी सुरू करण्यात आले होते. तसेच इतर १४४ उदंचन पंपांच्या सहाय्यानेही पाण्याचा उपसा करण्यात आला. या पावसाळय़ात या सर्व पंपांनी मिळून तब्बल ३७ हजार ५५० दशलक्ष लिटर पाणी उपसून समुद्रात फेकले आहेत. मुंबईच्या जवळ असलेल्या विहार आणि तुळशी तलावात मिळून सध्या जो पाणीसाठा आहे. त्यापेक्षाही उपसलेल्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पाऊस कसा ओतल्यासारखा पडतो हे लक्षात येऊ शकते.

पंप नसते तर…
पालिकेने उभारलेले हे पंप नसते तर मुंबईकरांना कल्पनाही करता येणार नाही इतकी हानी झाली असती. ओहोटी आल्यावर नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा निचरा होण्याची वाट बघत बसावे लागले असते. त्यामुळे मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असते.

पंपांनी उपसलेले पाणी – ३७ हजार ५५० दशलक्ष लिटर
विहार- तुळशीमधील साठा – ३५, ७४४ दशलक्ष लिटर