मूर्तीच्या उंचीचे बंधन नाही, गणेशोत्सव धूमधडाक्यातच! लवकरच नियमावली जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली दोन वर्षे कोरोनाच्या दहशतीखाली अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव या वर्षी मात्र धूमधडाक्यातच साजरा होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची आणि नियमांचे बंधन राहणार नाही. मात्र मूर्ती पर्यावरणपूरकच राहणार आहे. याबाबत शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दिली.

सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे 2020 मध्ये ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व दोन लाख घरगुती मूर्तीपैकी 20 टक्के गणेश मंडळे व 60 टक्के घरगुती मूर्ती दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शाडू किंवा कागदाला प्राधान्य देत असल्याचे गणेशोत्सव समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याची परवानगी देण्याच्या मागणीचे पत्रही याआधी आयुक्तांना दिले आहे. या बैठकीप्रसंगी माजी महापौर किशोरी पेडणेकर, समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, लालबाग गणेशोत्सव मंडळाचे सुधीर साळवी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपआयुक्त हर्षद काळे आदी उपस्थित होते.

समन्वय समितीचे म्हणणे

‘पीओपी’मध्ये असलेल्या घटकांमध्ये सल्फर, जिप्सम, फॉस्फरस, कॅल्शियम, मर्क्युरी, कार्बन आदी घटकांपैकी सर्वाधिक घातक घटक बाजूला करून ‘पीओपी’ मूर्ती तयार करता येऊ शकते का, याबद्दल सेंट्रल सायंटिफिक कमिटीकडे विचारणा करण्याचे सुचविले होते.

शिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमधील काही मुद्यांबाबत संभ्रम आहेत. या पार्श्वभूमीवर वरील पर्यायाचे पालिकेने समर्थन केले होते. तसेच समितीकडून सादर झालेल्या मागणीला पर्याय देण्याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याबाबत पालिकेकडून समन्वय समितीला अद्याप कोणताही ठोस निर्णय देण्यात आलेला नाही.

गेल्या दोन वर्षांतील असे होते निर्बंध

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अत्यंत मोजक्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचे बंधन होते. आगमन पिंवा विसर्जन मिरवणुकीचे बंधन, प्रसादवाटपाला बंधन, कार्यक्रमांना गर्दीचे बंधन होते. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रभाव कमी असल्यामुळे कोणतेही निर्बंध घालू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे.

घरगुती मूर्ती 2 फुटांची करा – पालिकेचे आवाहन

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी सुमारे 150 हून जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या तलावात 2 फुटांच्या मूर्तींचे विसर्जन करणे सोयिस्कर ठरते.

त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांच्याच कराव्यात असे आवाहन आणि विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शिवाय प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची विक्री किंवा खरेदी करू नये असे आवाहनही पालिकेने केले आहे.