खबरदार! मास्क वापरा नाही तर दंड भरा! दररोज 20 हजार लोकांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका अहोरात्र मेहनत घेत असताना काही मुंबईकर मात्र बेजबाबदारपणे मास्कशिवाय रस्त्यावर फिरत आहेत. अशा बेशिस्त, बेजबाबदार व्यक्तींमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे मुंबईकरांना शिस्त लागावी, यासाठी मास्कशिवाय फिरणाऱयांना सुमारे 20 हजार जणांवर दररोज कारवाई करा, असे आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत. या कारवाईवर आयुक्त स्वतः लक्ष ठेवणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार कोरोना संशयीत आणि कोरोना रुग्णांना अद्ययावत औषधोपचार मिळावेत  आणि ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. विविध उपाययोजनांसह सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, बस, रिक्षा, टॅक्सी आणि लोकलमध्येही मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग तसेच हात धुण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, तरीही काही बेजबाबदार व्यक्ती विनामास्क फिरून कोरोनाचा धोका मुंबईत वाढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्तांनी विनामास्कविरोधात मोहीम तीव्र केली आहे. विनामास्क फिरणाऱयांना 200 रुपयांचा दंड केला जात आहे. त्यासाठी घनकचरा विभागातील 500 कर्मचाऱयांचे पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईकरांवर कारवाई करणे हे आमचे लक्ष्य नसून त्यांना शिस्त लागावी, लोकांनी कोरोनाबाबत जागरुक व्हावे, ही कारवाई केली जात आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

रस्त्यांवर थुंकणाऱया 1,607 जणांवर कारवाई

पालिकेने शनिवार, 10 ऑक्टोबरला सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया 218 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 41 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, 17 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या 24 दिवसांत केलेल्या कारवाईत आतापर्यंत 1 हजार 607 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 89 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विनामास्क फिरणाऱया 31,602 जणांवर कारवाई 

पालिकेने  शनिवार, 10 ऑक्टोबरला सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱया 2,789 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 5 लाख 57 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, एप्रिल ते 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत 31 हजार 602 जणांवर कारवाई करण्यात आली तर त्यांच्याकडून आतापर्यंत 87 लाख 47 हजार 751 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.