पालिका शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुका

349

वैद्यकीय, प्रसूतीसारख्या कारणांसाठी मोठ्या रजेवर शिक्षक-शिक्षिका जातात. परिणामी विद्याथ्र्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांची 11 ते 179 दिवसांपर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार आता संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना विशेष अधिकार बहाल करणारे एक विशेष परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. त्या परिपत्रकानुसार पालिका शाळांमधून किंवा अनुदानित शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकाची तात्पुरत्या स्वरुपात व किमान वेतनानुसार अधिकाधिक 179 दिवसांपर्यंत नेमणूक करता येणार आहे. या प्रकारच्या नेमणुकीचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीत मंजूर करून घेतला जाणार आहे. अशा प्रकारची नेमणूक करताना मुख्याध्यापकांनी काय काळजी घ्यावी, याबाबतची माहितीही संबंधित परिपत्रकात देण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पाच दिवसांकरिता ‘डेटा एंट्री ऑपरेटर’
पालिका शाळेत दर महिन्याला कमाल पाच दिवसांकरिता ‘डेटा एंट्री ऑपरेटर’च्या तात्पुरत्या नेमणुकीचे अधिकारही मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. पालिकेच्या प्राथमिक शाळांत लिपिक नसल्यामुळे शाळेतील विविध कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

शाळांची गुणवत्ता वाढणार
शालेय उपक्रम राबवणे, पालक मेळावे आयोजित करणे, विविध विषयांवरील शैक्षणिक शिबिरांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी परीक्षा शुल्क अदा करणे, एसएससी बोर्ड परीक्षा मंडळाने निर्धारित केलेले प्रतिविद्यार्थी शुल्क भरणे इत्यादी बाबींचेही खर्च करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. यामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून शालेय गुणवत्तावाढीस या निर्णयामुळे हातभार लागणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या