
मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिकांची 421 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून विविध आरोग्य केंद्रांत सहाय्यक परिचारिकांची पदे रिक्त होती. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन देण्यात येणाऱया आरोग्यसेवेवर परिणाम होत होता. आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी पूर्णपणे होत नव्हती. मात्र म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यानंतर पालिकेच्या कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागामार्फत रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, चिटणीस संजय वाघ यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र दखल न घेतल्याने या खातेप्रमुखांची तक्रार आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आली. तसेच सदर रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही केली. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना कमी मनुष्यबळामुळे निर्माण झालेल्या समस्या, सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱयांवर अतिरिक्त कामाचा बोजा याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. याची दखल घेत उपआयुक्तांनी कार्यकारी आरोग्य अधिकाऱयांना सहाय्यक परिचारिकांची पदे त्वरित भरण्याचे लेखी आदेश दिले.
मुंबई महापालिकेअंतर्गत सहाय्यक परिचारिका या संवर्गातील एकूण 421 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून 25 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी जाहिरात पाहून अर्ज करावेत, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केले आहे.






























































