
कोविडपासून मुंबईकरांचा जीव वाचवताना स्वतः जीव कोरोनामुळे गमावलेल्या 201 कामगारांच्या कुटुंबीयांना पालिकेने 50 लाखांची आर्थिक मदत केली आहे. शिवाय कुटुंबातील एका वारसाला पालिकेच्या सेवेतही सामावून घेण्यात आले आहे. तर केंद्राकडून 23 जणांना 50 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोना पूर्ण आटोक्यात आल्याने ही योजना बंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना झपाटय़ाने पसरला. अशावेळी सगळीकडे लॉकडाऊन असताना पालिका आणि ‘बेस्ट’चे कर्मचारी मात्र मुंबईकरांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मातही केली. मात्र पालिकेच्या 277 तर ‘बेस्ट’च्या 163 कर्मचाऱ्यांना या कोरोना लढय़ात आपला जीव गमवावा लागला. मात्र सरकारच्या धोरणानुसार कोविड काम करताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना 50 लाखांची मदत करण्यात आली. यामध्ये अजूनही 23 अर्जावर मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.



























































