
सामना प्रतिनिधी । पुणे
खून केल्यानंतर मुंडके धडापासून वेगळे करून मृतदेह खड्ड्यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली आहे. हा मृतदेह कोंढव्यातील खडीमशीन चौक ते मंतरवाडी चौक यादरम्यान सापडला आहे. या मृतदेहाचे मुंडके शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
विलास राऊत (वय ५३, रा. येवलेवाडी) यांना सायंकाळी साडेचारच्या सुमारास खडमशीन चौक ते मंतरवाडी या रस्त्यावर बालाजी हॉटेलजवळ एका खड्ड्यात मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पुरुषाच्या मृतदेहाचे मुंडके गायब असल्याचे लक्षात आले. याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेला दिल्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा खून चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. त्याचा मुंडके नसलेला हा मृतदेह जेसीबीने बाहेर काढण्यात आला. जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खून करून मृतदेह खड्ड्यात टाकला आहे. या भागात रक्ताचे डागही आहेत. तसेच याठिकाणी ‘रामराजे निंबाळकर २०१७ श्री एसके ग्रूप’ असे लिहिलेला निळ्या रंगाचा रक्ताने माखलेला टी शर्टही सापडला आहे. या मृतदेहाचे मुंडके कापून नेण्यात आले आहे. तसेच हा मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्यात आल्याने कुत्र्यांनी लचके तोडून खाल्ले आहेत. या मृतदेहाचे मुंडके शोधण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
































































