तीन कोटींचा बोगस कंत्राटी कर्मचारी घोटाळा, सिडकोमध्ये १४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची होलसेल उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोगस कंत्राटी कर्मचारी दाखवून सुमारे तीन कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी 147 अधिकारी आणि कर्मचारी यांच्या होलसेल बदल्या केल्या. दहा वर्षांत प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यांमुळे सिडकोच्या वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिम पोस्टिंगला चिकटून बसलेल्या अनेक सम्राटांची पळापळ उडाली आहे. दरम्यान कंत्राटी कर्मचारी घोटाळ्याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून त्यामध्ये आणखी किती जणांची नावे येतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण ओळखल्या जाणाऱ्या सिडकोमध्ये यापूर्वी अनेक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कंत्राटी कर्मचारी घोटाळा प्रकाश झोतात आला. सहाय्यक अधिकारी म्हणून काम करीत असलेल्या प्रकाश तपाडिया याने बोगस कर्मचारी दाखवून सुमारे तीन कोटी रुपयांचा घपला केला. हा प्रकार सुमारे तीन वर्षांपासून सुरू होता. गेल्या दहा दिवसांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला. ही बाब व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी गांभीर्याने घेऊन 147 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विविध विभागांतील 31 लिपिक, 16 कार्यालयीन सहाय्यक, 15 क्षेत्र अधिकारी, 13 ड्राफ्ट्समन, 14 सर्वेयर, 10 स्टेनोग्राफर आणि 48 शिपायांचा समावेश आहे.

मोठे मासे धास्तावले सिडकोचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे फक्त मलईदार विभागात काम करतात. या अधिकाऱ्यांनी गडगंज संपत्ती जमा केली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे हे सर्वच मोठे मासे आता धास्तावले आहेत. हे बदल्यांचे सत्र आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याची चर्चा सिडकोच्या वर्तुळात आहे.
भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर नजर ठेवा बोगस कंत्राटी कर्मचारी घोटाळा घडवून आणणारा सहाय्यक अधिकारी सागर तपाडिया हा पनेवल येथे कार्यरत असताना लाच घेताना त्याला लाचलुचपत विभागने रंगेहात पकडले होते. त्याला निलंबितही करण्यात आले होते. इतक्या मोठ्या कारनाम्यानंतरही त्याला कार्मिक विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याकडे महत्त्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात येऊ नये. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात यावी, अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.