पुण्यानंतर ठाण्यातही 3300 बोगस दस्त नोंदणी, नोंदणी महानिरीक्षकांची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहर आणि हवेली तालुक्यात तुकडाबंदी व रेरा कायद्याचे उल्लंघन करून सुमारे साडेदहा हजार बोगस दस्त नोंदणी झाल्यानंतर आता ठाणे शहरामध्ये तब्बल 3300 बोगस दस्त नोंदणी झाल्याचे तपासणीत पुढे आले. यामध्ये दोन दुय्यम निबंधकांना निलंबित केले आहे तर 20 अन्य दुय्यम निबंधक व कर्माचाऱयांची विभागीय चौकशी सुरू करण्याची कारवाई करण्यात आली.

पुण्यात काल गुंठेवारी आणि रेरा कायद्यांतर्गत बनावट दस्त नोंदणी प्रकरणी 44 अधिकारी आणि कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता ठाणे शहरामध्ये देखील या पद्धतीने बोगस दस्त नोंदणी केल्याचे उघडकीस आल्याने एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी दिली.

शासनाने तुकडाबंदी कायदा लागू केला. तसेच रेरा कायदा लागू झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात राज्यात सर्रास या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून बोगस दस्त नोंदणी सुरू आहे. यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात आली. यात एकटय़ा पुणे शहरामध्ये तब्बल 10 हजार 561 पेक्षा अधिक बोगस दस्त नोंदणी झाल्याचे समोर आले. ठाणे, मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर शहरांमध्ये देखील अशा प्रकारे दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून बोगस दस्त नोंदणी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

राज्याचे नोंदणी आणि मुद्रांक महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी पुण्यानंतर ठाणे शहरामध्ये मोठी कारवाई केली. ठाणे शहरात देखील 3300 पेक्षा अधिक दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून बोगस दस्त नोंदणी केली आहे. यामुळेच येथील 22 दुय्यम निबंधक व कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली असे कराड यांनी स्पष्ट केले.
संभाजीनगरमध्ये कारवाई होणार

संभाजीनगर शहरांमध्ये तुकडे बंदी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून नोंदणी केलेले 43 जास्त आढळून आले आहेत. संभाजीनगरमधील दस्तांची छाननी सध्या सुरू आहे. उद्यापर्यंत अहवाल हाती येणार आहे. त्यानंतर संभाजीनगरमध्ये या प्रकरणात दोषी असणाऱया दुय्यम निबंधक आणि नोंदणी कर्मचाऱयांवर कारवाई केली जाणार आहे.