
हिंदुस्तानातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाने त्यांच्या हवाई कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेत एक मोठा बदल केला आहे. या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे. नव्या गणवेशाची पहिली झलक सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दाखवण्यात आली आहे. 2023 मध्ये झालेला हा बदल विशेष ठरणार आहे कारण गेल्या 60 वर्षांत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशात कोणताही बदल झालेला नाही.
नवीन गणवेशाची खास गोष्ट म्हणजे, प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हा गणवेश डिझाईन केला आहे. नवा गणवेश एअर इंडियाच्या समृद्ध इतिहासाला आणि उज्ज्वल भवितव्याची हमी देणारा असल्याचे सांगण्यात आले आहे. डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत हा नवा ड्रेसकोड लागू होईल अशी माहिती मिळते आहे. 10 हजारांहून अधिक ग्राऊंड स्टाफ, केबिन क्रू, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी हा नवा गणवेश असणार आहे.
Introducing our new Pilot & Cabin crew uniforms, an ode to Air India’s rich history and a promise of a bright future.
These uniforms, envisioned by India’s leading couturier @ManishMalhotra, features three quintessential Indian colours – red, aubergine and gold, representing the… pic.twitter.com/Pt1YBdJlMN
— Air India (@airindia) December 12, 2023
एअर इंडियाने सोशल मीडियावर याबाबतचा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला आणि पुरुष नवीन गणवेशात दिसत आहेत. डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी एअर इंडियासारख्या संस्थेचा ड्रेसकोड डिझाईन करणं ही आपल्यासाठीही एक अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया दिली. ‘हे माझं भाग्य आहे की मला एअर इंडियाचे वैमानिक आणि केबिन क्रू यांसाठी गणवेश तयार करण्याची संधी मिळाली. हिंदुस्तानची संस्कृती आणि परंपरेसोबतच आधुनिक लुक देणे हा गणवेश तयार करण्यामागचा माझा उद्देश होता असे त्यांनी म्हटले.
मनीष मल्होत्रा गेल्या तीन दशकांपासून फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कलाकारांच्या वेशभूषा तयार करण्याचे काम त्यांनी केले असून या कामासाठी त्यांचे अनेकदा कौतुकही झाले आहे.



























































