तारीख पे तारीख! बॉलीवूडवर कोरोनाचं सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यासह देशभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे, याचा फटका आता बॉलीवूडला बसत असल्याचे दिसतेय. सद्यपरिस्थितीत किती प्रेक्षक थिएटरकडे वळतील याची शाश्वती नसल्याने बॉलीवूडचे निर्मातेदेखील रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे ‘हाथी मेरे साथी’, आणि ‘चेहरे’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर गेले आहे. तर ‘बंटी और बबली 2’ देखील कोरोनामुळे पुढे ढकलला आहे.

कोरोनाच्या उद्रेकानंतर देशभरातील थिएटर दिवाळीपासून पुन्हा सुरू झाली आहेत. 50 टक्के प्रेक्षकांची अट असल्याने गेल्या पाच महिन्यांत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच बॉलीवूडचे नवीन चित्रपट रिलीज झाले आहेत. हळूहळू सर्व काही पूर्ववत होत असल्याने काही निर्मात्यांनी

मार्च-एप्रिलचा मुहूर्त निवडला होता, परंतु कोरोना पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. चित्रपटगृहांसाठीदेखील काही नियम आखण्यात आल्याने निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.

राणा दग्गुबाती आणि श्रीया पिळगावकरचा ‘हाथी मेरे साथी’ 26 मार्चला प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचे प्रदर्शन आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या ‘बंटी और बबली 2’ चेही प्रदर्शन पुढे ढकलले आहे.

हा चित्रपट 23 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर मंगळवारी ‘चेहरे’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 9 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येणार होता.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही ‘चेहरे’चे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. पुन्हा सारं काही सुरळीत झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांची थिएटरमध्ये वाट बघू.
– आनंद पंडित, निर्माते, चेहरे