
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगत तपास यंत्रणेचा युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायमूर्ती कर्णिक यांनी सुनावणी 2 डिसेंबरला घेणार असल्याचे निश्चित केले.
कथित खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गेल्या वर्षी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दिवाळीपूर्वी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अपिलावर मंगळवारी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची तब्येत ठीक नसल्याचे न्यायालयाला सांगितले आणि सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली.
त्यावर अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला. 73 वर्षीय अनिल देशमुख हे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात आहे. न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीचा विचार करावा, त्यांच्या अर्जाला विलंब करण्यासाठी सीबीआयकडून जाणूनबुजून चालढकल केली जात आहे, असा युक्तिवाद करत सिंग यांनी तातडीच्या सुनावणीसाठी तारीख देण्याची विनंती केली.
देशमुख यांनी केलेला दावा
अनिल देशमुख यांच्या अर्जामध्ये वैद्यकीय तसेच गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्याची विनंती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात जामीन मंजूर करताना नोंदवलेली निरीक्षणे विशेष सीबीआय न्यायालयाने विचारात घेतली नाहीत आणि जामीन अर्ज फेटाळून लावला. हा निर्णय देताना विशेष न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या परस्परविरोधी निरीक्षणे नोंदवली आहेत, असा दावा करीत जामिनासाठी दाद मागण्यात आली आहे.



























































