
सामना ऑनलाईन । काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरातील शिया मुस्लिम बहुल भागात पारसी नववर्षे स्वागताची धूमधाम सुरू असताना दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंग बॉम्बस्फोटात किमान सहाजण ठार, तर 26 जण जखमी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
मशिदीतील स्वच्छतागृहात, हॉस्पिटलमध्ये आणि एका इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये असे लपविण्यात आलेल्या तीन सुरुंगांचे स्फोट रिमोटने घडविण्यात आले. या हल्ल्याची तालीबानने जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिदुल्ला मायर यांनी सांगितले. काबूल विद्यापीठ आणि कारते साखी धार्मिकस्थळाजवळ स्फोट झाले. नवरोझ या पारंपरिक नववर्षदिनी सुटी दिली जाते. मात्र, हे बिगर इस्लामी असल्याचे कट्टरतावाद्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी या घटनेचा निषेध केला, तर भ्याड हल्ल्यात आमचे निष्पाप नागरिक मारले गेले, असे काबूल पोलिसांचे प्रवक्ते बशीर मुजाहिद यांनी सांगितले.दरम्यान, काबूल विद्यापीठानजीकचा एक सुरुंग शोधपथकांनी निकामी केला. या परिसरात अन्यत्र कोठे सुरूंग लपविले आहेत काय, याचा शोध घेण्यात येत आहे. 21 मार्च 2018 रोजी धार्मिकस्थळाजवळ केलेल्या स्फोटात 33 जण ठार झाले होते. त्या स्फोटाची जबाबदारी ‘इसिस’ने घेतली होती. ‘इसिस’नेहमी शिया मुस्लिमांना टार्गेट करीत असते.
























































