नि:शब्द कोलाहल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरविंद दोडे

जेव्हा केव्हा जागतिक पातळीवर संपूर्ण जगावर आपत्ती कोसळतात तेव्हा कलावंत आणि साहित्यिक आपापल्या कला माध्यमांतून जे भाष्य करतात ते सत्याचे हृदयद्रावक दर्शन घडवतात. या गोष्टीला कवींचा विचार अग्रक्रमाने करावा लागतो. ‘कोरोना’चे क्रूर वादळ अत्यंत समर्थपणे प्रा. अशोक बागवे यांनी ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ या काव्यसंग्रहात बंदिस्त केले आहे.

वाट चुकलेल्या संभ्रमित माणसाला दिशासुद्धा भयभ्रमात पाडतात. कवी म्हणतो, ‘तसे प्रत्येक वेळी आपणाला/ रस्ते सापडतातच असे नाही. कित्येकदा रस्त्यांना आपण सापडलेलो असतो. ही विसंगती आपण अनेकदा अनुभवतो. गाव बदलतं. शहरही बदलतं. माणूसही आतून-बाहेरून बदलत जातो. तसं सगळं आपल्यासाठी असतंच असं नाही याचा प्रत्यय येतो. गावी जावे की शहरातच राहावे हे कळत नाही. वेस ओलांडण्याची इच्छा प्रबळ होते आणि वाटते, ही रात्र संपणार की नाही? इथे आपण उगाच जागा अडवलीय. कवी म्हणतो, ‘पुढे पुढे लोक अनोळखी होत जातील.’ कारण रोज बेबंद निर्बंध बदलत असतात. त्यातही पुन्हा ‘सर्वत्र दंडुक्यांची वसाहत, भीतीची शांतता काळीज व्यापून, पसरत गेलेली दिशापार, नि दूर गेलेल्या माणसांची, अतोनात वाट पाहणारे, भरलेले डोळे मिटत मिटत चालेले…’ हे भीषण वास्तव इस्पितळातील रुग्णांच्या व्यथांची नोंद करते. तना-मनाचा संपर्क तुटावा अशी हतबलता मनावर ओरखडा ओढते. माणसाच्या घराचं रुग्णालय झालंय आणि माणूस रुग्ण झालाय जणू.

सभोवती नैराश्याचे अमाप पिक आल्यावर दोष द्यायचा तरी कुणाला? आसपास नाराजी आणि आपण ‘नाईलाज.’ परस्परात ठरावीक अंतर ठेवणारी आपली प्राचीन परंपरा ‘वर्णाश्रमधर्मा’त वाचायला मिळते. ‘मनेसुद्धा सर्वांची अदृश्य हाताच्या अंतरावर, अंतर वाढत वाढत, एकाकी पडल्याची भावना…’ मानसिक ताण वाढण्याच्या या प्राणशून्य वायूत माणुसकी जगण्यासाठी धडपडतेय. ‘सार्वत्रिक भीतीची बियाणे पेरण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.’ राजकीय प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढल्यावर असेही घडू शकते. ‘इतरांना नगण्य करण्यातच’ काही सत्ताधाऱयांचे यश शाबूत राहते!
‘चैतन्यहीन वैभव’ नक्की कसे असते याचे उत्तर देताना कवी सांगतो, ‘???? हाच मध्यबिंदू ठरावा, माझ्या परिघाचा’ या परिघात जिवंतपणा आणायचा कुठून? ‘मृत्यूसत्ताक राज्यपद्धती’त मृत्यू साक्षर होण्यासाठी आदेश मानायलाच हवा. कालांतराने भूमीवर उरतील का पशुपक्षी, माणसे? पृथ्वीफेरी थांबेल का? कवी भविष्य वर्तवतो, ‘आपण गेल्यानंतर शेवटचा दिस गोड होईल.’ हा आशावाद महत्त्वाचा तुरुंगातल्या अस्तित्वाला मोकळा श्वास घेऊ देणारी ही कविता ‘मैलाचा दगड’ ठरावी इतकी भयाण सुंदर आहे!

मौनाचा निःशब्द कोलाहल
लेखक – प्रा. अशोक बागवे
प्रकाशक – सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे
पृष्ठ – 94, मूल्य – रुपये 200/-