>>देवेंद्र जाधव
मल्लिका अमरशेख यांचे हे शब्द काळजाला भिडतात आणि क्षणभर डोळय़ासमोर चेहऱयावर सुरकुत्या पडलेलं, तरीही प्रेमळ असं आईचं रूप दिसतं. मल्लिका अमरशेख यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. थोर कवी आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांची बायको. केवळ इतकाच त्यांचा परिचय नाही, तर स्वतःच्या शब्दांमधून सामाजिक व्यवस्थेवर जळजळीत ताशेरे ओढणाऱया कवयित्री म्हणून मल्लिका अमरशेख यांची विशेष ओळख आहे. मल्लिका अमरशेख यांचा ‘भयचकिताच्या सावल्या’ हा काव्यसंग्रह आपल्या मनात साचलेली घुसमट शब्दरूपात मांडतो. या काव्यसंग्रहात मल्लिका अमरशेख यांनी लिहिलेल्या सुमारे 90 हून अधिक कविता समाविष्ट आहेत. या कवितांना मुक्तछंदाचं स्वरूप आहे. तीन-चार ओळीत एखादी कविता संपते आणि आपल्याला चटका लावून जाते.
‘आयुष्य कळताना जामच त्रास झाला
मग जगण्याचा नाद सोडून दिला
मग कसं सगळं सोपं सोपं होत गेलं
मेलेल्या हरणाच्या उघडय़ा डोळय़ासारखं…!’
‘आयुष्य’ नावाच्या या कवितेत चार ओळींमध्ये मल्लिका जगण्याचा अर्थ उलगडून सांगतात. या काव्यसंग्रहातील बहुतांश कवितेत जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही कविता जरी जगण्याचं तत्त्वज्ञान मांडतात. त्यात आशावाद आहे. एक प्रेमाची किनार आहे.
‘मला वाटलं मी जिवंत आहे, तेव्हाच प्रेम म्हणालं कुजबुजत कानाशी,
ही तर अफवा आहे’
या तीन ओळींमध्ये एक गूढ छटा आहे. मल्लिका जणू आयुष्याचं सार त्यांच्या लेखणीतून उतरवतात, पण काही कवितेतून त्या रोमँटिकसुद्धा होतात.
‘पहाट जेव्हा तिच्या पाठीच्या पन्हाळीवर पडते
तेव्हा ती आणखीनच सुंदर दिसते हे मी पहाटेला सांगू की तिला?’
भोवतालचं जग झपाटय़ाने बदलत आहे. वाढणारी लोकसंख्या, सरकारी उदासीनता, पर्यावरणाचा ऱहास अशा गोष्टी आपल्या डोळय़ांसमोर घडत आहे. मल्लिका अमरशेख यांची कविता आसपासच्या याच परिस्थितीवर प्रखर भाष्य करते.
‘भयचकिताच्या सावल्या’ या काव्यसंग्रहात मल्लिका अमरशेख यांनी लिहिलेल्या कविता वरकरणी वाचून विसरून चालणार नाही. तर त्यातली प्रत्येक ओळ ही मनात कुठेतरी साठून ठेवण्यासारखी आहे. या कविता वाचताना आपलं दैनंदिन जगणंच वेगळय़ा रूपात आपल्या समोर येतं. वास्तव जगण्याशी निगडित काही वाचायचे असल्यास मल्लिका अमरशेख लिखित ‘भयचकिताच्या सावल्या’ या काव्यसंग्रहाचा जरूर आस्वाद घ्या. हरवलेलं पुन्हा काहीतरी सापडेल याची खात्री!
भयचकिताच्या सावल्या (काव्यसंग्रह)
लेखिका : मल्लिका अमरशेख
प्रकाशक : मुक्ता प्रकाशन
पृष्ठs : 87, मूल्य : रुपये 200/-





























































