
>> संध्या सिनकर
आजकाल कुठेही पाहिले तरी लोक एकमेकांशी बोलण्याऐवजी फोनचे छोटे पडदे पाहत रमले आहेत हे दृश्य सगळीकडे दिसते. सोशल मीडिया सध्या तेजीत आहे. सोशल मीडियामुळे एकमेकांमधील संवाद हरवत चालला आहे. सोशल मीडियावर हाती लागलेली बीजं घेऊन लेखिकेने तिचे विचार लिहिले आहेत. ‘जाळ्यातले मोती’ हे माधुरी शानभाग लिखित पुस्तक अतिशय वाचनीय आहे. माधुरी शानभाग यांची शैली प्रसन्न व सकारात्मक विचार देणारी आहे.
‘जात नाही ती जात’ या लेखात त्यांनी म्हटले आहे, ‘‘एक स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा ती जातविहीन होते. अशा सर्व काळात ती आपला मातृधर्म निभावत असते आणि चारही जातींची कर्तव्यं ही आपल्या शक्तीनुसार व कुवतीनुसार पार पाडते. माधुरीजींना वाटते, प्रत्येकाने मातृधर्म आपल्या कुटुंबापुरता जरी स्वीकारला तरी मनातील जळमटे दूर होतील. ‘कालातीत असलेला संवाद’ या लेखात गुरू-शिष्यांना सांगतो, आयुष्याचे विश्लेषण करू नका, फक्त जगत रहा. जेव्हा तुम्ही त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करता तेव्हा वैचारिक गोंधळ उत्पन्न होतो, असे अनेक चांगले विचार गुरु-शिष्यांच्या संवादातून समजतात.
‘आंधळ्यांनी घेतलेली शाळा’ या लेखात अंध लोकांच्या संस्थेत निमंत्रित चाळिसेक लोकांनी काळोखात जेवण घेणे हा कार्यक्रम होता. ही गोष्ट वाचल्यावर ज्या डोळ्यांमुळे आपण सुंदर जग पाहू शकतो, त्याविषयी अपार कृतज्ञता वाटते. ‘आनंदाचे डोही’ हा माणसाला आनंद होतो म्हणजे काय होतं ही शास्त्रीय माहिती सांगणारा हा अभ्यासपूर्ण लेख आहे.
माधुरीजींची शैली सहज व प्रसन्न आहे. काही लेखात छान गोष्टीतून त्यांनी सांगितलेले चांगले सकारात्मक विचार वाचकांना चैतन्य देतात. काही लेख परिपक्वतेने व समजूतदारपणे कसे वागावे असं सांगतात. पुस्तक वाचताना आपण इतरांशी अधिक सहृदयपणे, सहनशीलतेने व डोकं शांत ठेवून वागायला पाहिजे हे लक्षात येते. लहान लहान गोष्टी व त्यातून उलगडत जाणारे विचार यामुळे माधुरी शानभाग लिखित ‘जाळ्यातले मोती’ हे पुस्तक रंजक व विचारांना चालना देणारे आहे.
जाळ्यातले मोती
लेखिका : माधुरी शानभाग
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
मूल्य : रुपये 240/-





























































