
>> प्रभाकर पवार
शौर्य, उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी संजय लक्ष्मण कदम या पोलीस अधिकाऱयाचा तीन वेळा पोलीस पदक बहाल करून गौरव केला होता. असा हा निसर्गदत्त गुणवंत, चाणाक्ष व जाणता पोलीस अधिकारी एप्रिलअखेरीस पोलीस उपायुक्त असे नॉमिनेशन मिळाल्यानंतर निवृत्त झाला. थेट फौजदार ते सहायक पोलीस आयुक्त अशी संजय कदम यांची 36 वर्षे पोलीस सेवा पार पडली. अखेर निवृत्त होता होता का होईना त्यांना DCP म्हणून Nomination मिळाले, हेही नसे थोडके! एक उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून संजय कदम यांना डझनभर पुरस्कार मिळालेले आहेत. पोलीस सेवेत कोणत्याही क्लिष्ट गुन्हय़ांचा तपास करताना संजय कदम यांना बरेच कटू-गोड अनुभव आले होते. त्यातील आठ केसेसचे एकत्र संकलन करून कदम यांनी एक छोटेखानी पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘अष्टौप्रहर’ असे या शोधकथांचे नाव असून ते फारच वाचनीय झाले आहे. संजय कदम यांच्या सिद्धहस्त लेखणीतून 176 पानांचे पुस्तक साकारले आहे.
‘सरदार नावाची वल्ली’, ‘सोयरा’, ‘खंडणीखोरांची पारध’, ‘दक्षिण मुंबईतील दरोडे’, ‘गैरहजेरी’, ‘खोटी फिर्याद’, ‘नऊ दिवसांची नवलाई’, ‘गस्तीवरील खबर’ अशा या उत्कृष्टपणे तपास केलेल्या आठ कथा असून त्यातील ‘खंडणीखोरांची पारध’, ‘दक्षिण मुंबईतील दरोडे’ व ‘गस्तीवरील खबर’ या तीन शोधकथा वाचल्यावर विश्वास कुणावर ठेवावा? असा प्रश्न पडतो. ‘खंडणीखोरांची पारध’ या गूढ केससमध्ये मालकाला खंडणीसाठी धमकावण्यात येत होते. त्यात त्याचा नोकरच सामील असल्याचे उघड झाले होते, तर दक्षिण मुंबईतील दरोडय़ाच्या गुन्हय़ांमध्ये हॉटेलमध्ये काम करणारी वेटरांची टोळी आढळून येते. हॉटेलमधील काम संपल्यावर वेटर रात्री एकत्र येऊन बंद घरे, कार्यालय फोडून चोऱया करायचे, तर ‘गस्तीवरील खबर’ ही शोधकथा वाचून अंगावर काटा उभा राहतो. परप्रांतातील मुलींना नोकरीच्या आमिषाने मुंबईत आणायचे आणि त्या मुलींना केवळ पाच-दहा हजारांत विकायचे. अशा एका महिलेला संजय कदम मिळालेल्या खबरीवरून सापळा रचून पकडतात व एका तरुण मुलीला नरकात जाण्यापासून वाचवितात, अशी ही ‘गस्तीवरील खबर’ स्टोरी असून ती कथा वाचताना अंगावर काटा उभा राहतो.
गुन्हे शोध सत्यकथा अष्टौप्रहर
लेखक – संजय लक्ष्मण कदम
पृष्ठ – 176
मूल्य – 200



























































