बोरिवलीत हॉटेल कर्मचाऱ्यावर चॉपर हल्ला, वेटरवर उपचार सुरू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा चालकाच्या वेशात आलेल्या एकाने हॉटेल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना आज बोरिवली परिसरात घडली. चाकू हल्ल्यात सलीम बुराणीया हा जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून तपासासाठी पथक तयार केले आहे.

सलीम हा बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहे. मंगळवारी रात्री तो डय़ुटीला आला होता. आज सकाळी सलीम हा रिसेप्शन काउंटरवर बसला होता. सकाळी पावणेआठच्या सुमारास एकजण रिक्षा चालकाच्या वेशात आला. मी रिक्षा चालक आहे, मला माझे पैसे घ्यायचे आहेत, असे हल्लेखोराने सलीमला सांगितले. तेव्हा सलीमने हॉटेलमध्ये विचारपूस करून कोणी बाहेरील व्यक्ती आली नसल्याचे त्या हल्लेखोराला सांगितले. काही वेळाने हल्लेखोरासोबत आणखी एक जण हॉटेलमध्ये आला. तो काही न सांगताच वर गेला. त्याला विचारणा करण्यासाठी सलीम हा हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर गेला.

सलीमने त्या दोघांना जाब विचारला. तेव्हा एका हल्लेखोराने कमरेला लावलेले पिस्तूल काढून सलीमला धमकावले. त्यानंतर त्या दोघांत झालेल्या झटापटीत हल्लेखोरांचे पिस्तूल खाली पडले. पिस्तूल खाली पडल्यावर हल्लेखोराने चॉपर काढून सलीमवर वार केले. त्यानंतर दोघे पळून गेले. या घटनेची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमी सलीमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चापू हल्लाप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.