लज्जास्पद! एड्सने मृत्यू झाल्याने अंत्यविधीला नकार, मुलाचा मृतदेह घेऊन मातेने फोडला हंबरडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

एचआयव्हीग्रस्त अनाथ मातेला दोन आपत्य, सहा वर्षापूर्वी एचआयव्हीनेच मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. आज वयाच्या बाराव्या वर्षी मुलाचा जीव गेला. एड्सने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी वाळीत टाकले. मुलाच्या मृतदेहाला मुंगळे लागले मात्र अंत्यविधीला कोणी येईना. अखेर या मुलाला कपड्यामध्ये गुंडाळून असाह्य झालेल्या मातेने 50 कि.मी.चे अंतर कापून इन्फंट संस्थेकडे धाव घेतली. मन सुन्न करणारी धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली.

एकीकडे पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू करून माणुसकीचे दर्शन घडत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अनाथ मातेचा एड्सग्रस्त बारा वर्षाचा मुलगा आज पहाटे मृत्युमुखी पडला. मुलगा मयत झाल्याने मातेने टाहो फोडला. संपूर्ण गावकरी हे विदारक दृश्य दूरवरून बघत होते. सहा-सात तास मृतदेह मातेच्या खोलीमध्ये पडून होता. गावकऱ्यांनी पाठ वळवली. एड्सने मृत्यू झाल्याने अंत्यविधीला कोणीच यायला तयार नव्हते. मदत करायला कोणी धावत नव्हतं. या मयत चिमुकल्याच्या शरीराला मुंगळ्यांनी वेढले. मात्र अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येत नसल्याने गरिब असाह्य मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला एका कपड्यामध्ये गुंडाळले. कडेवर घेऊन अंत्यविधीसाठी 50 कि.मी.चे अंतर कापले. बीड शहरानजिक असणाऱ्या एड्सग्रस्त अनाथ मुलांच्या इन्फंट इंडिया या संस्थेकडे धाव घेतली.

‘दादा माझ्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला. एड्सच्या भितीने घराकडे कोणी फिरकेना. तुम्ही मला आधार द्या, आसरा द्या, माझ्या बाळाचे अंत्यसंस्कार करा’, असे म्हणत हंबरडा फोडला. शेवटी इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये एचआयव्हीग्रस्त चिमुकल्यांना सोबत घेऊन वेदना स्मशानस्थळी त्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.