मधमाशांपासून वाचण्यासाठी तलावात मारली उडी, मात्र पिराना माशांनी घेतला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही काहीही केले तरी, तुम्ही तुमच्या नशिबापासून पळ काढू शकत नाही. असं म्हणतात. मात्र ब्राझीलमधील ही घटना वाचल्यानंतर तुमचा या वाक्यावर नक्कीच विश्वास बसेल. ब्राझीलमध्ये एक व्यक्ती मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी या मच्छिमाराने तलावात उडी घेतली. मात्र त्याच्या दुर्दैवाने त्या तलावात भरमसाठ जीवघेण्या पिराना मासे होते. तलावात उडी घेताच शेकडो पिराना माशांनी त्याच्या संपूर्ण शरीराचा चावा घेत त्याचा जीव घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत 30 वर्षीय व्यक्ती आपल्या दोन मित्रांसह मासेमारीसाठी गेला होता. याच दरम्यान त्यांच्यावर मधमाश्यांची हल्ला केला. मधमाश्यांपासून वाचण्यासाठी या तिघांनी तलावात उडी घेतली. त्यातले दोन तलावातून नंतर बाहेर आले. मात्र तिसरा व्यक्ती बाहेर येऊ शकला नाही. नंतर या व्यक्तीचा किनाऱ्यापासून 13 फुटांवर मृतदेह सापडला. या व्यक्तीचा मृतदेह मिळाला तेव्हा त्याचा चेहरा, कान आणि शरीराच्या काही भागांचा माशांनी चावलेला दिसला. तलावातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर याची तपासणी करण्यासाठी घटनास्थळी काही अधिकारी दाखल झाले. त्यांना या व्यतीच्या मृत्यू मागे कोणतेही कटकारस्थान नसल्याचे दिसल्याने त्यांनी त्याच्या अंत्यसंस्काराची परवानगी दिली.

मृताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या व्यक्तीचा मृत्यू बुडून झाला की, पिराना मासे चावल्याने झाला, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील तलाव आणि नद्यांमध्ये पिरान्हाच्या सुमारे 30 प्रजाती आढळतात. त्याचा जबडा अतिशय तीष्ण असा असतो. हा मासा अत्यंत धोकादायक असून काही सेकंदातच हा मासा आपल्या भक्ष्याचा शेकडोवेळा चावा घेऊ शकतो. या माशाला पाण्याची हालचाल जाणवताच तो सावध होतो आणि शिकार करण्यास तयार होतो. 2007 मध्ये ब्राझीलच्या पालमास शहराजवळील तलावामध्ये सुमारे 200 पिरान्हा हल्ल्यांची नोंद झाली होती. या हल्ल्यात पिराना माशांनी अधिकतर लोकांच्या पायाचा चावा घेतला होता.