
सामना ऑनलाईन,सेंट पिटर्सबर्ग
ब्राझीलला फिफा वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत स्वित्झर्लंडविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे उद्या, २२ जूनला ‘इ’ गटात आव्हान राखण्यासाठी कोस्टा रिकाविरुद्ध ब्राझीलला आता जिंकावेच लागणार आहे. स्टार खेळाडू नेमार फिट झाल्याने ब्राझीलला मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रमुख स्ट्रायकर नेमारच्या पायाला दुखापत झाल्याने ब्राझीलचा पाय खोलात गेला होता, मात्र त्याने गुरुवारी सराव करून आपण फिट असल्याचे दाखवून दिल्याने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दुसरीकडे कोस्टा रिकाला सलामीच्या लढतीत सर्बियाने १-० गोलफरकाने हरविले. त्यामुळे कोस्टा रिकासाठीही शुक्रवारची लढत ‘करो या मरो’ अशीच असेल. स्वित्झर्लंडने जसे नेमारची नाकेबंदी करून लढत बरोबरीवर सोडविण्यात यश मिळविले त्याचप्रमाणे कोस्टा रिकाच्या खेळाडूंनीही नेमारला रोखण्यासाठी नक्कीच रणनीती आखली असेल. यावेळी नेमारच्या इतर सहकाऱ्यानाही गोल करण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
आजच्या लढती
ब्राझील वि. कोस्टा रिका (सायं. ५.३० वा.)
नायजेरिया वि. आइसलॅण्ड (रात्री ८.३० वा.)
सर्बिया वि. स्वित्झर्लंड (रात्री ११.३० वा.)




























































