ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू, 82 वर्षीय वृद्धाला दिला पहिला डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीकरणात ब्रिटनने पुन्हा बाजी मारली आहे. देशात फायझर-बायोएनटेकच्या लसीनंतर ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस टोचण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रुग्णालयात 82 वर्षीय ब्रायन पिंकर यांना ऑक्सफर्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. पहिल्या टप्प्यात 5 लाख 30 हजार लोकांना ही लस टोचली जाणार आहे.

पिंकर हे ऑक्सफर्ड लसीचे जगातील पहिले लाभार्थी ठरले आहेत. त्यांना किडनी विकार असून त्यांची डायलिसिस सुरू आहे. डोस घेतल्यामुळे चिंता दूर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासह 88 वर्षीय संगीत शिक्षक ट्रेवोर कॉलेट व ऑक्सफर्ड रुग्णालयातील बालरोगतज्ञ अॅण्ड्रय़ू पोलार्ड यांनाही लस टोचण्यात आली. या लसीला हिंदुस्थानात ‘कोविशिल्ड’ नाव देण्यात आले आहे. हिंदुस्थानने या लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात ब्रिटनने बाजी मारली. ही लस अत्यंत स्वस्त तसेच सामान्य फ्रीजमध्येही ठेवता येऊ शकते. या लसीच्या वापरामुळे ब्रिटनमध्ये लसीकरणाला गती मिळणार आहे.

हा ब्रिटनच्या विज्ञानाचा विजय – पंतप्रधान जॉन्सन

ऑक्सफर्डने तयार केलेली लस हा ब्रिटनच्या विज्ञानाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली. येत्या काळातही आपल्यापुढे आव्हाने असतील, पण यंदा आपण कोरोना विषाणूला हरवू व नव्याने उभे राहू असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. ऑक्सफर्ड लस ही देशाच्या कोरोना लसीकरण मोहिमेतील मैलाचा दगड मानली जात आहे.