अडीच लाख घरटी बांधणारा अवलिया; राकेश खत्री बनले ‘नेस्ट मॅन ऑफ इंडिया’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथील अशोक विहारमध्ये राहणारे राकेश खत्री ‘नेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. राकेश खत्री यांनी पक्ष्यांवरील प्रेमापोटी आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक घरटी बांधली आहेत. ते लोकांना घरटे बनवायलाही शिकवतात. त्यांनी सुमारे दहा लाख मुलांना घरटे बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या कामासाठी त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.  

राकेश खत्री यांचे लहानपणापासून पक्ष्यांवर प्रेम आहे. पक्ष्यांना हक्काचं घर असावं, यासाठी ते घरटी बांधत आहेत. ते पक्षी संवर्धनाचे महत्त्व पटवून  घरटे बांधण्याचे धडेही देतात. ते सांगतात, पक्ष्यांना घरांची गरज आहे. पूर्वी आमच्या घरात चिमण्या राहायच्या, पण नंतर आम्ही घराचे दरवाजे बंद केले. खत्री पुढे म्हणाले, ‘मी लाखो विद्यार्थ्यांना घरटी बनवायला शिकवले आहे. सुरुवातीला लोक माझी चेष्टा करायचे आणि त्यांनी बनवलेल्या घरटय़ात पक्षी कसे शिरतील असे म्हणायचे. मात्र, पक्षी घरटय़ात येऊ लागल्यावर लोकांना पटलं आणि त्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.

कोरोना काळात खत्री यांनी वेबिनार आयोजित करून घरटी बांधण्याबाबत मार्गदर्शन केले. ताग, प्लॅस्टिक, गवत, लाकूड यांच्यापासून घरटी कशी बनवायची हे शिकवले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसह पाच पुरस्कार मिळाल्याचा दावा खत्री यांनी केला आहे. चिमण्यांच्या संवर्धनावरील सर्वोत्तम पद्धतीसाठी आंतरराष्ट्रीय ग्रीन अॅपल पुरस्कार याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.