
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी उद्या मतदान होत असून 12 उमेदवार निवडणूक मैदानात आहे. अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रावर कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांच्या पोलींग पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून गावोगावीच्या 1979 मतदार केंद्रावर रवाना झाल्या आहेत. या दिवशी प्रत्येक मतदाराने आपले काम सोडून सर्वोच्च प्राधान्य या कामाला देऊन आपल्या मताधिकाराचा उपयोग करावा. मतदान करून लोकशाहीला सुदृढ, सशक्त करावे. मतदानाला प्रेरीत करावे. असे आवाहन वेळोवेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी विविध मतदान जनजागृती उपक्रमांमधून केले आहे. शेवटच्या दिवशीही जिल्हाधिकारी यांनी मतदारांना मतदान करण्याचे विनम्र आवाहन केले आहे.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 1979 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान होत आहे. एकूण 17 लाख 58 हजार 943 मतदार असून मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सर्वत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळेस आयोगाने मतदान केंद्रांवर सुविधांमध्ये वाढ केली आहे. वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात येण्या व जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हिल चेअरची व्यवस्थासुद्धा असणार आहे. या सर्व सुविधांचा दिव्यांग मतदारांनी लाभ घेत सकाळच्या सत्रात मतदान करावे. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधासुद्धा असणार आहे. तरी मतदारांनी सकाळी 7 वाजताच घराबाहेर पडून मतदान करावे.
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसल्यास – पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड पुरावा म्हणून चालणार आहे.
































































