चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. झुंजीवर लाखोंच्या पैजा लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात.
यंदाही शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. निमित्त होते रेड्यांच्या पारंपरिक झुंजीचे. या झुंजीवर लाखो रुपयाच्या पैजा लागत असल्याने या झुंजीचे शौकीन या दिवशी बरोबर नेमक्या परिसरात दाखल होतात. रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन येतात आणि मग सुरु होतो झुंजीचा खरा थरार.
शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार होतात. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना होतात. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार आपल्या पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात.




























































