
पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या घरफोडीत पाऊण किलो चांदीसह सोने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील प्रकाश चापके यांचे घर आहे. बुधवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघराचे कुलूप तोडून स्टोअर रूममधील पत्र्याच्या पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रुपये चोरट्यांनी लांबवले.
या प्रकरणी प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद खोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.पी. चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत चोरट्यांनी चॅनेलगेट व त्यानंतर स्वयंपाकघराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
स्टोअररूमध्ये ठेवलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीतील पाऊण किलो चांदीचा ऐवज ज्यात चांदीची दोन ताटे, दोन ग्लास, दोन पंचेपाळ, करंडे असा 750 ग्रॅम वजनाचा ऐवज , ज्याची किंमत 45 हजार रुपये आहे तसेच सोन्याचे दीड तोळ्याचे गळ्यातील दागिने आणि 3 अंगठ्या, लहान मुलांचे कानातील कुडके दोन जोड (किंमत 40 हजार रुपये) याशिवाय 14 हजार रुपये रोख असा सुमारे 99 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करीत आहेत.
























































