
नगर शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्यानंतर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद असलेली नगर शहर बससेवा (एमएमटी) सुरू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर बससेवेला प्रशासनाने ब्रेक दिला होता. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे आता बससेवा सुरू झाली आहे. शहरातील इंजिनीअरिंग कॉलेज, निर्मलनगर, निंबळक शाहूनगर व आलमगीर मार्गावर नियोजित वेळेवर बससेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हांतर्गत मार्गावरील एसटीची बससेवाही सुरळीत होत असल्याचे दिसून येत आहे.
बाहेरगावाहून येणारे नागरिक शहरांतर्गत वाहतुकीसाठी दुचाकी आणि रिक्षांचा वापर करीत आहेत. परंतु, आता त्यांना शहर बससेवेचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. जुलै 2019 मध्ये नगर शहरात शहर बससेवा सुरू करण्यात आली. याआधीही शहर बससेवा सुरू होती; परंतु काही कारणांमुळे ती बंद पडली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा प्रयत्न करून शहर बससेवा सुरू केली.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी नगर शहरामध्ये 15 शहर बस विविध मार्गांवर धावत होत्या. साधारण पाच ते सहा हजार प्रवासी रोज प्रवास करीत होते. शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातून या बस सुटून दिल्ली गेट, जिल्हा रुग्णालय, पाइपलाइन रोड, निर्मलनगर, निंबळक आणि भिंगार या भागांमध्ये धावत होत्या. अन्य प्रवासी वाहनांच्या तुलनेत या बसचे प्रवास भाडेदेखील कमी आहे. शहरातील नागरिकांची या प्रवासाला पसंती मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस प्रवासीसंख्येत वाढ झाली होती.
उपनगरांमध्येही बससेवा सुरू करण्याची मागणी
शहरात काही ठिकाणी रस्ते खूप खराब आहेत. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना रिक्षात प्रवास करताना त्रास होत आहे. तरीसुद्धा प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बससेवा सुरू होत्या. शहरातील प्रवासी रिक्षांच्या तुलनेत या बसची संख्या तशी खूपच कमी आहे. तसेच, अडचणीदेखील जास्त आहेत. मात्र, असे असले तरी या अडचणींवर मात करून महापालिका प्रशासनाद्वारे बससेवा सुरू केली होती. यामुळे दुसरीकडे शहर बससेवेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. शहरातील केडगाव, बोल्हेगाव, तपोवन रोड, सारसनगर अशा अन्य उपनगरांतसुद्धा बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
दिवाळीपर्यंत पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होणार
नगर शहरातील जनजीवन सुरळीत झाल्यामुळे शहर बससेवा सुरू करण्याच्या हालचाली केल्या होत्या. महापालिका प्रशासनाने दीपाली ट्रान्स्पोर्टला शहर बससेवा सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार दीपाली ट्रान्स्पोर्टकडून नऊ बस सुरू करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने मागणीनुसार शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत सर्व बस सुरू करण्यात येणार आहेत. आगामी काळात या बससेवेचा विस्तार करण्याचे प्रशासनाचे नियोजनही आहे. त्यानुसार आगामी काळात आणखी काही भागात बससेवा सुरू केली जाणार आहे.




























































