आता सहावीपासूनच व्यवसाय शिक्षण, नवीन शिक्षण धोरणानुसार जून 2023 पासून अंमलबजावणीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेघा गवंडे-किटे

राज्यात नवीन शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपासूनच व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) नुसार सध्या नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम निवडता येतो. पण लवकरच सहावीपासून विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम निवडता येणार आहे.

देशात कुशल कामगार निर्मिती व्हावी, हा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात नववी, दहावीला व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे पाच ट्रेंड राबविण्यात येत आहेत. व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख लहान वयातच विद्यार्थ्यांना होण्यासाठी तसेच त्यांच्यातील विविध कौशल्यांना चालना देण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे प्रात्यक्षिक अभ्यासता येणार आहे. नवीन शिक्षण धोरणात व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विशद करण्यात आले असून राज्यात या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रम
नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, कृषी, होम सायन्स, ऊर्जा आणि पर्यावरण हे चार ट्रेंड राबविले जातात.
अभ्यासक्रमाद्वारे या विषयांची तोंडओळख करण्यावर भर.
70 गुणांचे प्रात्यक्षिक व 30 गुणांच्या लेखी परीक्षेमुळे स्कोअरिंग अभ्यासक्रम.
हिंदी, सामाजिक शास्त्र हे विषय वगळून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम निवडता येतो.
मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय मात्र सक्तीचे आहेत. कुशल कारागीर घडतील.

पण जूनपासून अंमलबजावणी अशक्य
सहावीपासून हा अभ्यासक्रम राबविताना अभ्यासक्रमाची कन्सेप्ट काय असेल, विषय कोणते असतील याविषयी काही ठोस हालचाली दिसत नाहीत. याशिवाय अद्याप या अभ्यासक्रमासाठी अभ्यास गट मंडळाची स्थापनादेखील झालेली नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवत्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम निवडल्यास जास्तीत जास्त घरात कुशल कारागीर निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षणाचे धडे देणे हा नवीन शिक्षण धोरण 2020 चा एक भाग आहे. राज्यातील 50 टक्के विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाशी जोडणे हे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून सध्या काम सुरू आहे. त्यानुसार दरवर्षी काही शाळा आम्ही व्यवसाय शिक्षणाशी जोडत आहोत. शालेय शिक्षण विभागातंर्गत राज्यात नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जून 2023 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.
– कैलास पगारे, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षण