व्यापार्‍याचे मांजरीतून अपहरण अन् मुंबईत सुटका; अपहरणाचे कारण अस्पष्ट, आरोपीच्या मागावर पथके

मांजरी येथील व्यापार्‍याच्या दुकानामध्ये गिर्‍हाईक म्हणून आलेल्या तिघांनी व्यापार्‍याला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडल्याने एकच खळबळ उडाली. अपहरणकर्त्यांनी काही तासानंतर व्यापार्‍याला मुंबईतील वसई नाक्यावर सोडून दिले. व्यापारी परतही आला. मात्र, अपहरणामागचे कारण अस्पष्ट असून पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर आहेत.

बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास मांजरी येथून व्यापार्‍याचे अपहरण करण्यात आले. याबाबत 28 वर्षीय व्यवसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबंधीत व्यापारी हा मूळ राजस्थान राज्यातील जोधपूरमधील रहिवासी आहे. मागील चार वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असून मांजरी भागात त्याचे गिफ्ट अर्टिकलची दुकाने आहेत. बुधवारी रात्री ते मांजरीतील दुकानामध्ये असताना तिघांनी ग्राहक म्हणून दुकानात प्रवेश केला. यानंतर त्यांना ओढत रस्त्यावर आणले. त्यावेळी अपहरणकर्त्यांचे आणखी तिघे साथीदार तेथे बोलेरो गाडी घेवून बाहेर थांबले होते.

सहा जणांनी व्यापार्‍याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. येथील प्रत्यक्षदर्शीनी हा प्रकार पोलिसांना कळविला. माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरिंवद गोकुळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

यानंतर तात्काळ आरोपीच्या मागावर पथक रवाना करण्यात आले आहे. एवढ्यात अपहरणकर्त्यांनी काही तासानंतर मुंबईतील वसई नाका येथे व्यापार्‍याला सोडल्याची माहिती मिळाली. व्यापार्‍याने ही बाब कुटुंबीयांना कळवून तो पुण्यात परतलाही. मात्र, त्याच्या अपहरणामागील कारण पोलिसांना समजू शकले नाही. पोलिसांकडून व्यापार्‍याची चौकशी करण्यात येत असून अपहरणकर्त्यांचा माग काढण्यात येत आहे. अपहरणकर्ते मिळून आल्यानंतरच या अपहरणामागील कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.